कालसुरी-तुरुंबाडी रस्त्याची चाळण

रस्ता नुतनीकरणाची मागणी

| बोर्लीपंचतन | वार्ताहार |

गेल्या काही वर्षांपासून कालसुरी पुलाजवळील धसापासून तुरुंबाडीपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्याचा नाहक त्रास प्रवाशांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी कालसूरी ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे.

वारळ दत्तगुरु मंदिर ते कालसुरी गावाजवळील पुलापर्यंतचा रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले आहे. पंरतु, त्या पुढील रस्त्याच्या वळणावर मोठा धस आहे. त्यामुळे त्या रस्त्यावर मोठ्या दरडी कोसळत असतात. त्यामुळे या मार्गावरुन जाणऱ्या गाड्यांचा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यातच दुरवस्था झालेला हा रस्ता नुसताच खडीने भरण्यात आला होता. त्यामुळे ती खडी पावसात वाहून गेली आहे. तसेच, या ठिकाणी असलेल्या दास कंपनीची अवजड वाहने देखील याच मार्गावर धावत असतात. त्यामुळे या रस्त्याची पार चाळण झाली आहे. मात्र, तरीदेखील कंपनी प्रशासनासह संबंधित अधिकारी या रस्ता दुरुस्तीच्या मागणीकडे जाणून बूजून दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप स्थानिकांमधून होत आहे. तसेच, दोन महिन्यांवर गणपती सण आला आहे. त्याचे भान ठेऊन तरी खड्डेमय झालेल्या रस्त्याकडे प्रशासनाचे अधिकारी लक्ष देतील का? असा संतप्त सवाल देखील ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.

दरम्यान, या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व रुंदीकरण व्हावे यासाठी ग्रामस्थांच्यावतीने सरंपच राजेंद्र घोसाळकर यांनी विद्यमान खासदारांजवळ चर्चा करून निवेदन दिले होते. त्यावेळी खासदारांनी हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती व रुंदीकरण संदर्भात काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु, अद्यापपर्यंत त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या रस्त्याच्या कामाकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्यानची खंत सरपंच घोसाळकर यांच्यासह उपसरपंच विनया पेरवी, सदस्य धिरज वारगे, राजेंद्र नाक्ती संतोष नाक्ती, संतोष पेरवी, मनोहर वारगे, नरेश वारगे, राजाराम चाळके, राजाराम नाक्ती व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version