ब्रिटिशांनी शोधलेला रस्त्यातुन भटकंती
। नेरळ । प्रतिनिधी ।
ब्रिटिशांनी 1850 मध्ये माथेरान हे जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण शोधून काढले. त्यावेळी ब्रिटिश ज्या रस्त्याने डोंगर चढून माथ्यावरील रानावर पोहचले होते, त्या शिवाजी ग्लॅडर रस्त्याने हौशी ट्रेकर्स भटकंती निमित्त ट्रेकिंग करीत माथेरानमध्ये पोहोचत आहेत. माथेरानची पहिली पायवाट म्हणून ओळखल्या जाणार्या त्या रस्त्याने अक्षरशः घामाघूम होऊन रस्ते शोधत भटकंती केली जात आहे.
दरम्यान, ट्रेकर्स मंदार लेले यांनी आपले सहकारी अभिजित मराठे तसेच अन्य सहकार्यांना सोबत घेऊन माथेरानचा शोध लागलेल्या पहिल्या पायवाटेवरून करावे भागातून जाण्यासाठी निघाले. बुरुजवाडी येथील काटवण वाडी भागातून गणेश गोरे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि गावातील वारे यांना सोबत घेऊन काटवणं मार्गे ते माथेरानकडे निघाले. त्यांनी काटवण ते माथेरानमधील अलेक्झांडर पॉईंट अशी दीड तासाची खडी चढाई सर करून ते माथेरान बाजारपेठेत पोहोचले. परतीचा प्रवास करताना त्यांनी दुसरा मार्ग अवलंबत माधवजी बाग पॉइंटने पुन्हा काटवन गावात पोहोचले. असा पूर्ण गोलाकार ट्रेक एका दिवसात पार करून माथेरानला जाणार्या दोन वेगवेगळ्या घाट वाटा त्यांनी सर केल्या.
या भटकंतीत अलेक्झांडर पॉइंटने वर जाताना एका ठिकाणी रॉकपॅचवर जवळपास 15-20 पायर्या दिसून येत आहेत. त्याबद्दल विचारणा केली असता ब्रिटिश अधिकार्याने शिकार केलेल्या वाघाला वरती घेऊन जाण्यासाठी बनवल्या असल्याची माहिती स्थानिक लोकांकडून मिळाली. या निमित्ताने माथेरानचा शोध लावताना वापर केला गेलेल्या सर्वात पहिल्या पायवाटांचा अनुभव घेता आला.
मंदार लेले,
ट्रेकर्स