| पेण | प्रतिनिधी |
मी पेण पूर्व विभागात लहानपणापासून येतो. माणसं घडवली आणि माणसं विचारांनी घडली तर ती कधीच विचार कधी सोडत नाही. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे महादेव दिवेकर. तो विचारांनी घडला व संस्कारांनी घडला आहे, असा गौरवही यावेळी केला. शेतकरी कामगार पक्ष सोडलेला माणूस कधी पुन्हा आमदार झाला नाही, ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली आणि खोकेवाल्यांनीसुध्दा गद्दारी केली त्यांना जनता धडा शिकवणारच आहे. सावरसई गाव आणि पेण पूर्व विभाग माझाच आहे तो माझाच राहील. शेकापचा लाल बावटा कोणी उखडू शकत नाही. तो असाच कायम राहील असा, विश्वास शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. पेण तालुक्यातील सावरसई येथे हनुमान मंदिराच्या जिर्णोध्दार प्रसंगी आयोजीत कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.
काहीच महिन्यापूर्वी शेकापचा लालबावटा सोडून धैर्यशील पाटील यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले. ते गेल्याने पेणमध्ये शेकाप संपला असे चित्र जाणीवपूर्वक निर्माण करण्यात येत होते. मात्र नेते गेले पण शेकापचा मतदार आजही शेकापसोबतच असल्याचे पेणच्या जनतेने दाखवून दिले आहे, असे त्यांनी यावेळी धैर्यशील पाटील यांचे नाव न घेता ठणकावून सांगितले.
अनेक वर्ष शेकापमध्ये होतो, आता सुध्दा आहे आणि उद्यासुध्दा राहीन. आ. जयंत पाटील शब्द पाळणारे नेते आहेत. गेली आठ महिने काही अडचणीमुळे राजकारणापासून लांब राहिलो, परंतु आता पुन्हा उभारी घेणार आहे. ज्यांनी मला कठीण प्रसंगात मदत केली त्यांना मी कधीच विसरू शकणार नाही, असे सांगून माजी सभापती महादेव दिवेकर यांनी पक्षाशी एकनिष्ठ असल्याची ग्वाही यावेळी दिली. शेवटपर्यंत मी शेकापक्षाचे काम करत राहीन. माजी आ. मोहन पाटील यांच्या तालमीत मी शिकलो ते माझे गुरू आहेत, तर भाई जयंत पाटील हे माझ्यासाठी दिशादर्शक आहेत. काही कारणास्तव मी पक्षापासून दूर गेला होतो परंतु माझी चूक कळताच मी माघारी परत आलो आहे, असे दिवकेर यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी आ. बाळाराम पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, सुप्रिया पाटील, पनवेलचे राजेश केणी, शिशिर धारकर, पी.डी पाटील, संतोष जंगम, नारायण डामसे, राजू कोरडे, सुरेश खैरे, नारायण घरत, समीर म्हात्रे, जगदीश ठाकूर, योगेश दिवेकर, निळकंठ दिवेकर, भगवान सावंत, संदीप देसाई, दौलत केणे, सरपंच आरती पाटील, स्मिता पाटील, किशोर पाटील, गणेश बोर्डे आदी उपस्थित होते.
पेण भोगावती पुलापासून ते सावरसई पर्यंत पेण-खोपोली रस्त्याला दुतर्फा शेतकरी कामगार पक्षाचे झेंडे लावल्याने जणू काही पूर्व विभाग लाल बावटयाच्या रंगात रंगलेला पहायला मिळत होता. आ. जयंत पाटील यांची मिरवणूक पेण-खोपोली रस्त्यावरून गावापर्यंत ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली. या मिरवणुकीसाठी महादेव दिवेकर समर्थक हजारोच्या संख्येने उपस्थित होते. पूर्व विभागात झालेल्या या कार्यक्रमामुळे शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा उभारी मिळणार आहे.