तीन जणांना अटक
। कल्याण । प्रतिनिधी ।
कल्याण पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे यांनी परिमंडळ 3 कल्याण स्तरावर अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता विशेष पोलीस पथक स्थापन केले असून या पथकाने गांजा अंमली पदार्थ विकणार्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे.
डोंबिवली पोलीस स्टेशन व पोलीस उपआयुक्त, परिमंडळ 3, कल्याण पथकाने दोन दिवसांत संयुक्तपणे केलेल्या कारवाई दरम्यान एकुण पाच लाख 97,780 रुपये किंमतीचा 29 किलो 955 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच, तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.
विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण व पोलीस पथक मंगळवारी गस्त करीत असताना दुपारी 12 च्या सुमारास आयरेगांव, डोंबिवली पूर्व येथे एक इसम संशयास्पदरित्या लपण्याचा प्रयत्न करित असताना, त्यास पळून जाताना पकडले. या इसमाच्या ताब्यातील प्लास्टिकच्या पिशवीची झडती घेतली असता, त्यामध्ये सात किलो 66 गॅम वजनाचा एक लाख 40 हजार रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ सापडला. डोंबिवली पूर्वेत राहणार्या या आरोपीचे नाव किरण शहा (42) असे असून त्याच्याविरुद्ध डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत त्याला गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
तसेच, विशेष पथकातील पोलीस उप निरीक्षक प्रसाद चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने चोळेगांव तलाव, डोंबिवली पूर्व येथे सापळा लावुन थांबलेले असताना, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येथे मध्य प्रदेश येथील सचिन मोरे (21) व संजु लुहार (24) हे दोन इसम आले. त्यांना थांबवुन, त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता, या दोघांच्या बॅगेमध्ये 22 किलो, 889 गॅम वजनाचा चार लाख 57,780 रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ सापडला. या दोन्ही आरोपींविरुद्ध डोंबिवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.