आदिवासी शेतकर्‍यांचा होणार कायापालट

परिवर्तन संस्था, अर्चना ट्रस्टचा पुढाकार
। अलिबाग । प्रतिनिधी ।

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या योजनेंतर्गत पनवेलमधील परिवर्तन सामाजिक संस्था आणि तारा येथील अर्चना ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने 16 लाभार्थी शेतकर्‍यांना मोफत तुषार/ठिबक सिंचन संचाचे वाटप करण्यात आले. या संचामुळे शेती आणि शेतकर्‍यांचा कायापालट होईल, असा विश्‍वास पेण एकात्मिक आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी शशिकला आहिरराव यांनी व्यक्त केला. पनवेलमधील बागेचीवाडी, माडभुवन, घेरावडे आदिवासीवाडीत गुरुवारी (दि.28) हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी परिवर्तन सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रमिला पाटील, सचिव दत्ता शिरसाठ, पायल आंब्रे, रत्नाकर घरत, दर्शना पाटील, रिया पाटील, प्रसाद किणी, अंकुश माडे यांच्यासह बागेचीवाडीतील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासी शेतकर्‍यांना उन्हाळ्यात भाजीपाला पिकविता यावा, यासाठी तुषार/ठिबक सिंचन संचाचे वाटप करण्यात आले. पाण्याच्या योग्य नियोजनामुळे शेती आणि शेतकर्‍यांच्या जीवनाचा कायपालट होणार असून, उत्पादन आणि उत्पन्नात भरीव अशी वाढ होईल. यामुळे आदिवासी शेतकर्‍यांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर नक्कीच उंचावेल, असेही आहिरराव यांनी म्हटले आहे. दरम्यान, परिवर्तन सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रमिला पाटील यांनी बागेचीवाडीतील आदिवासी महिलांना मासिक पाळी आणि आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर घरत यांनी, तर आभार प्रमिला पाटील यांनी मानले.

Exit mobile version