। उरण । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील आदिवासींच्या विकास निधीचा गैरवापर करणार्या रा.जि.प.बांधकाम उविभाग पेण यांच्यावर दंडात्मक कारवाई करून आदिवासी वाड्यांचे रस्ते बनविणे, गावठाण मंजूर करून घरकुल योजना राबविण्यात यावी, आदिवासी वाडीला लागून असलेल्या बेकायदेशीर दगड खाणी बंद करणे यासह इतर मागण्यांसाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्यावतीने संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वात बुधवारी (दि.16) पेण येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघाल्यानंतर पेण नगरपरिषदेजवळ हा मोर्चा पोलिसांनी अडवून मोर्चेकर्यांचे शिष्टमंडळ प्रांत कार्यालयात बैठकीसाठी घेऊन गेले. या बैठकीत पेण प्रांत प्रवीण पवार, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण पाटकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता रवी पाचपोर, तहसीलदार सचिन शेजाळ व संतोष ठाकूर, मानसी पाटील, किशोर पाटील, सुनिल वाघमारे, जितेंद्र वाघमारे, विशाल पवार, नर्मदा वाघे, काळया कडू, रामा खाकर, नरेश कडू, सविता पवार, महादेव शिद, रामदास पवार, धनाजी वाघे उपस्थित होते.
या बैठकीत शिष्टमंडळाने केलेल्या मागण्यांनुसार उंबरमाल, खवसावाडी येथील आदिवासी वाड्यांच्या रस्त्यांच्या विकास निधीमध्ये झालेल्या गैर वापराची चौकशी करण्यात येईल. तसेच, तांबडी येथील सभागृह, खैरासवाडी, वडमालवाडी, माळवाडी, काजूवाडी या वाड्यांच्या रस्ते, उंबरमाळ येथील शाळा इमारत दुरुस्तीचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात येतील, असे गटविकास अधिकारी लता मोहिते यांनी सांगितले. तर, तहसीलदार सचिन शेजाळ यांनी आदिवासींच्या प्रलंबित जातीच्या दाखल्यांचे अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्यात येतील. तसेच, खैरासवाडी शेजारी असलेल्या दगड खाणीबाबत आदिवासींना होत असलेल्या समस्यांसाठी महसूल विभागाच्या अधिकार्यांना दोन दिवसात प्रत्यक्ष पाहणी करण्यास पाठविले जाईल, असे सांगितले.