। मुंबई । वृत्तसंस्था ।
सहावी ते दहावीच्या वर्गात शिकत असताना, केलेल्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीच्या आधारे दहावीच्या परीक्षेत क्रीडागुण सवलतीचा लाभ घेता येईल; पण, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा बारावीत क्रीडा कोट्यातील गुण मिळणार नाहीत. बारावीला ही सवलत मिळण्यासाठी अकरावी अथवा बारावीमध्ये शिकत असताना, आवश्यक क्रीडा कामगिरी करणे गरजेची आहे, असे क्रीडा व युवक सेवा आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. दहावीच्या विद्यार्थ्याला क्रीडा गुण सवलतीचा लाभ घ्यायचा असल्यास विद्यार्थ्याने सहावी ते दहावीमध्ये कोणत्याही वर्षात शिकताना क्रीडागुणासाठी पात्र प्रावीण्य मिळविणे आवश्यक असून, सहावीत असताना मिळविलेल्या क्रीडा प्राविण्याच्या आधारे वाढीव गुण हवे असल्यास अशा विद्यार्थ्यांने सातवी अथवा आठवीमध्ये असताना, त्या वर्षात आयोजित स्पर्धांमध्ये किमान सहभाग घेणे आवश्यक असल्याचेही क्रीडा विभागाने म्हटले आहे.