| उरण | वार्ताहर |
सोनारी गावातील एका घराच्या स्वच्छतागृहाच्या टाकीची सफाई सुरू असताना दोन सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सक्शन पंप वाहन चालक विकास टाक, पनवेल व क्लिनर यश जैस्वाल, उत्तर प्रदेश अशी या दोन सफाई कामगारांची नावे आहेत.
सोनारी गावातील काशिनाथ तांडेल यांच्या घराच्या स्वछतागृहाच्या टाकीच्या सफाईचे काम करीत असताना एक कामगार टाकीतील उर्वरित घाण साफ करण्यासाठी टाकीत उतरला होता. मात्र त्याला गुदमरल्या सारखे वाटल्याने मैला वाहून नेणाऱ्या वाहनावरील सहाय्यक क्लिनरने या कामगाराला मदतीचा हात देऊन टाकी बाहेर काढले. मात्र त्याचवेळी त्याचा तोल जाऊन तो टाकीत कोसळला. त्याला सावरण्यासाठी वाहन चालकाने मदतीचा हात दिला मात्र त्याचाही तोल गेल्याने दोघेही टाकीत पडले. या दरम्यान टाकीतील वायूच्या दर्पामुळे गुदमरून चालक व क्लिनर यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी घर मालक काशिनाथ तांडेल, वाहन मालक विशाल मंजुळे व सफाई कंत्राटदार अमोल खुटले यांच्यावर न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ओवे यांनी दिली.