पोलादपुरातील अमर कदम या तरुणाची यशोगाथा
| पोलादपूर | शैलेश पालकर |
मुंबईतून पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ गावाकडे कोरोना लॉकडाऊननंतर परतलेल्या अमर राजेंद्र कदम या तरूणाने गेल्या तीन-चार वर्षांमध्ये प्रचंड मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर प्रायोगिक शेती करीत ‘ड्रॅगन्स फ्रूट्स’ची यशस्वी शेती केली आहे. या शेतीतून लाखो रूपयांचे उत्पादन करून गावाकडून मुंबईकडे नोकरीधंद्यासाठी जाणाऱ्या तरूणांना गावाकडेच प्रायोगिक शेती करण्याचा संदेश दिला आहे.
कोरोना लॉकडाऊन काळात अनेकांच्या आयुष्याची दिशा बदलली. अमर राजेंद्र कदम या तरूणाचे पदवीचे शिक्षण सुरू असताना त्याचे वडील राजेंद्र कदम यांनी अमरला गावाकडे पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ येथील जमिनीवर शेती करून उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करण्याचा सल्ला दिला. लहानपणी चिखलमाती हाताला लागली तरी किळस वाटणारा अमर या सल्ल्यामुळे विचारात पडला. यानंतर अमरने कोकणात विशेषत: पोलादपर तालुक्यातील उताराच्या जमिनीवर ठिबक सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध करून घेता येणाऱ्या पिकांचे प्रयोग करण्याचे ठरविले. अमरने पारंपरिक भातशेती करण्याऐवजी सुरूवातीला कलिंगड, अननस, झेंडूची फुले अशी पिके घेतली. याच काळात ड्रॅगन्स फ्रूटस्च्या शेतीचा विचार अमरला शेती माती आणि हवामानाच्या अभ्यासामुळे सुचला. पोलादपूर तालुका कृषी विभागाचे मोरे, गुंड आणि भरत कदम यांनी अमरला ड्रॅगन्स फ्रूटसची शेती करण्याचा अभिनव प्रयोग करण्यासाठी रोपे मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले. पंचायत समिती कृषी विभागाचे अरूण धीवरे यांनी कुंपणासाठीचे अनुदान देण्याची तयारी दर्शविली. मात्र, अमर कदमने स्वयंप्रेरणेने या प्रायोगिक शेतीमध्ये तन-मन झोकून काम सुरू केले. कुंपणासाठी सिमेंट पोल आणि जाळ्यादेखील अमरने शेतावरच तयार करून जोडधंदा सुरू केला.
सुरूवातीला 350 ड्रॅगन फ्रुट्ससाठी पोल उभे करणाऱ्या अमरने आतापर्यंत 1200 ड्रॅगन फ्रुट्ससाठी पोल उभे केले आहेत. सुरूवातीला दोन वर्षे कठोर परिश्रम आणि केवळ मेहनत करताना अमरला अपेक्षित उत्पादन येण्याबाबत साशंकता निर्माण झाली. बाजारपेठेची मागणी आणि आंतरराष्ट्रीय कृषीक्षेत्रात मागणीच्या तुलनेत ड्रॅगन फ्रूट्सचे उत्पादन व्हीएतनाम आणि चीनमध्ये 20 टक्के उत्पादन होते. त्यामुळे भारतात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पोलादपूरसारख्या ग्रामीण तालुक्यामध्ये अनेक तरूण जर या ड्रॅगन्स फ्रूट पिकासाठी सरसावले, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या मागणीनुसार मोठ्या प्रमाणात पुरवठा पोलादपूर तालुक्यातून केला जाऊ शकेल, असा आत्मविश्वास अमरने व्यक्त केला.
वर्षातून दोन वेळा या रोपांची वाढ होऊन पावसाळ्यामध्ये फळांचे उत्पादन होण्याची वेळ आल्यानंतर अमरने दीड वर्षांमध्ये फारसे खर्च व उत्पन्नाचे समीकरण जमून आले नसले तरी त्यानंतर दोनच वर्षांमध्ये खर्च वजा जाता खर्चाच्या दुपटीने निव्वळ नफा सुरू झाला असून, ही शेती 25 वर्षांपर्यंत दुपटीने उत्पन्न देणारी आहे तसेच ड्रॅगनचे झाड हे निवडुंग प्रकारचे असल्याने या झाडाला रोग बुरशी व करपा होण्याची शक्यता नसते, अशी माहिती अमरने यावेळी दिली.
अमरने गेल्या तीन-चार वर्षांमध्ये वाडवडिलांच्या जमिनीवर आंब्यांची फळबाग तसेच लिंबांची बाग लावून काही वेगळ्या रोपांचे प्रायोगिक तत्त्वावर संवर्धन सुरू केले असल्याने मुंबईचा अमर आता खेड्यातच रमल्याने सुरूवातीला तो मुंबईची वाट धरेल, असे उपहासाने बोलणारे गावकरी आता अमरच्या चिकाटीसह जिद्द, मेहनतीची तसेच प्रायोगिक शेतीची प्रशंसा करू लागले आहेत. गावाकडून मुंबईकडे नोकरी धंद्यासाठी गेलेल्या तरूणवर्गाने गावाकडेच प्रायोगिक पध्दतीची शेती केल्यास उत्पन्नाचे साधन गावाकडे निर्माण करता येऊन इतरांना मार्गदर्शन करण्याची मानसिकता अमरला आता गावाकडे चला अशी प्रेरणा देण्यासाठी ड्रॅगन्स फ्रूटसारख्या शेतीतून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची मागणी पूर्ण करण्याइतपत उत्पादन करण्यासाठी प्रवृत्त करीत आहे.