तरुणांच्या मोहिमेला तीन वर्षांनी आले यश
| नेरळ | वर्ताहर |
कर्जत शहरच्या मध्यभागातून वाहणाऱ्या उळस नदीला पूर्वी अतिक्रमण आणि सांडपाण्याचा विळखा पडला होता. उल्हास नदी संवर्धन टिमकडून गेली तीन वर्षे सातत्याने स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. त्याचवेळी नदीकाठ परिसरात औषधी आणि फुलझाडे लावली जात आहेत. त्या झाडांमुळे उल्हास नदीचा काठ फुलाला आहे.
खंडाळा लोणावळा येथे उगम झालेली उल्हास नदी कर्जत शहरातून वाहते आणि हीच नदी कर्जत शहराला वळसा घालून पुढे जाते. या नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी कर्जत शहरातील तरुणांनी उल्हास नदी निर्मल जल अभियान सुरू केले आहे. मागील दोन वर्षाच्या कार्याला यश आल्याचे चित्र दिसत आहे. उल्हास नदी निर्मल जल अभियानातर्फे लावण्यात आलेली झाडे आता मोठी झाली आहेत. तेथील संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर घाट वृक्षवल्लीने सजला आहे. कर्जतकरांसाठी हा सुखद धक्का आहे. उल्हास नदी निर्मल जल अभियानमधून यात कदंब, ताम्हण, करंज, हरडा, पिंपळ, चिंच अशा एकूण 52 झाडांचा समावेश आहे. वड,बकुळ, औदुंबर,कडुनिंब, बहवा आदी झाडांची लागवड करतानाच प्राजक्त,डबल तगर,जास्वंद अशी फुलझाडे यांचे जतन केले जात आहे. नदी परिसर स्वच्छ ठेवणे या साठी समीर सोहोनी आणि मुकुंद भागवत ह्या दोन व्यक्ती दररोज सकाळी सुमारे एक तास नदीचाकाठ फिरत असतात. आत्तापर्यंत संस्थेने तसेच कर्जतमधील अनेक नागरिकांनी विविध प्रकारची झाडे संस्थेला दिली. 2019 ते 2023 या दरम्यान पावसाळ्यात दोन वेळा आलेल्या पुरात काही झाडे वाहून गेली, तर काही झाडे जागेवरच आडवी झाली होती. ती संस्थेतर्फे मशागत करून पुन्हा उभी करण्यात येत आहेत. या वृक्षसंपदेची फळे आपल्याला काही वर्षात मिळण्यास सुरुवात होईल.
या वृक्षराजीमुळे उल्हास नदीच्या परिसरात आता ऑक्सिजन सर्वांना देवू शकणार आहे. त्याचवेळी या झाडांच्या गर्दीमुळे नदी परिसराला नवीन रूप आले आहे. नदीचा किनारा देखील सुरक्षित झाला आहे. याच अनुषंगाने नदी किनारे स्वच्छ करण्यासाठी संस्थेने प्रयत्न केला होता. संस्थेतर्फे आंब्याच्या कोयी देण्याचे नागरिकांना आवाहन उल्हास नदी निर्मल जल अभियानाने केले होते. त्यावेळी नागरिकांना त्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला होता आणि त्याचे फलित म्हणून शेकडो आंब्याची रोपे दिसून येत आहेत. दुसरीकडे डबल तगर, जास्वंदी, पारिजात, तीन रंगाच्या गुलाबाची फुलझाडे जतन केली जात आहेत. त्यात जांभूळ,पिंपळ,वड,कदंब यांची 21 तर फुलांची काही झाडे आणून लावण्यात आली आहेत. त्यामुळे नदी काठ आता गवतामुळे नाही तर सुगंधी फुलांनी तसेच औषधी वनस्पतींनी बहरला आहे. त्यातील सर्वात मोठे असे औदुंबर हे सध्याच्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या जागेतून उचलून नदीकाठी आणून लावले आहे.