महापुराचा धोका कमी करण्याचा प्रयत्न
पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यावर भर
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील भिवपुरी स्टेशनपासून कर्जत स्टेशन या भागात मध्य रेल्वेकडून कारशेड उभारले जाणार आहे. या कारशेडसाठी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करण्यात आला असून या भरावामुळे या भागातील गावांमध्ये पावसाळ्यात महापुराची पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे स्थानिकांच्या आक्षेपानंतर रेल्वेच्या माध्यमातून त्या उल्हासनदीचे खोलीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान कर्जत तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी स्थानिक ग्रामस्थांना शब्द दिला होता आणि त्याप्रमाणे नदी खोलीकरण केले जात आहे.
कर्जत तालुक्यात रेल्वे प्रशासनाकडून कारशेड बांधले जात आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणावर मातीचा भराव केला जात आहे. मात्र हा परिसर उल्हास नदीच्या तीरावर असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर महापुराचा धोका निर्माण झाला आहे. याकडे लक्ष वेधत स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. याच पार्श्वभूमीवर तीन दिवसांपूर्वी कर्जतच्या तहसीलदारांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, पावसाळ्याचा कालावधी संपेपर्यंत भरावाचे काम बंद ठेवण्यात आले.
त्यानंतर रात्रीच्या वेळी मातीचा भराव टाकण्याचे काम सुरूच होते आणि परिणामी अनेक ग्रामस्थांनी कर्जत तहसील कार्यालयावर धडक दिली होती. त्यावेळी कर्जत तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी उल्हासनदीचे खोलीकरण आणि संवर्धन करण्याचे काम आपण रेल्वेकडून करून घेऊ असे आश्वासन दिले होते.
त्यानंतर उल्हासनदीच्या तीरावरील व्हावे,बेडसे या भागातील उल्हासनदीचे पात्र खोल करण्यास सुरुवात झाली आहे. तेथे नदी पात्रात असलेले खडक फोडून आणि नदीमधील गाळ माती काढून पावसाळ्यातील पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.
जेसीबी आणि प्रिक्लेम मशीन यांच्या मदतीने हि कामे सुरु असून मोठ्या प्रमाणात नदी खोलीकरण केल्याने कारशेड साठी करण्यात आलेला भराव यामुळे निर्माण झालेला धोका कमी होईल असा प्रशासनाचा दावा आहे.
खोलीकरण केले तरी धोका कायम: ग्रामस्थ
पावसाळ्यात या भागात जमणारे पावसाचे पाणी लक्षात घेऊन नदीचे खोलीकरण कितीही केले तरी उल्हास दनीकिनाऱ्यालगतच्या गावांमध्ये महापुराची पाणी शिरून नुकसान होणारच? असे या गावांमधील ग्रामस्थांना वाटत आहे. त्यामुळे प्रशासनाने नदी खोलीकरण करून पावसाळ्यातील महापुराची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पुराचा धोका असणाऱ्या गावांमधून बोलले जात आहे.







