कुणी पाणी देता का पाणी?

रोहेकरांची पाण्यासाठीची वणवण कायम
5 दिवसानंतरही पाणी प्रश्‍न कायम
। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा शहरातील पाणी योजनेचे काम अद्यापही अपूर्ण असल्याने, शहरवासीयांवर कुणी पाणी देता का पाणी? असा करुण प्रश्‍न विचारण्याची वेळ आली आहे. गेले पाच दिवस पाण्यासाठी रोहेकरांची वणवण कायम असल्याचे चित्र आहे.
पृथ्वीवरील सर्वच सजीव सृष्टीला जीवन जगण्यासाठी पाणी या मुलभूत घटकाची आवश्यकता आहे. मानवी समूहाची रचनाच पाणी या घटकामुळे झाली असून, अनेक मानवी वस्त्या जलस्त्रोतांभोवती केंद्रीत झाली आहेत.
रायगड जिल्ह्यातील अशा अनेक वस्त्या नदीपरिसरात वसल्या असून, त्यापैकीच एक म्हणजे रोहा. कुंदलिका नदीपरिसरात वसलेला हा प्रदेश हळूहळू आधुनिकतेकडे मार्गक्रमण करत आहेत. आणि त्याचदृष्टिने येणार्‍या उपभोग्य सुखसुविधांसोबतच समस्यांचेही आगमन होत आहे.
सद्यःस्थितीत रोहा शहरवासीयांना पाणी प्रश्‍नांनी त्रस्त केले आहे. मागील पाच दिवसांपासून रोहा शहरात नळ योजनेद्वारे पाण्याचा थेंब उपलब्ध होत नसल्याने रोह्यातील नागरिकांना तीव्र पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे.
टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा शहरातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवू शकत नाही, हे उघड वास्तव आहे. आळीत आलेल्या पाण्याच्या टँकरवर महिला,पुरुष यांची झुंबड पडत आहे. तर सदनिकांमध्ये उंचावर राहणार्‍या वृद्धांचे मात्र पाणी पुरवठा बंद असल्याने प्रचंड हाल होत आहेत.
नगरपालिका प्रशासनाने पाणी समस्या केव्हापर्यंत दूर होईल याबाबत नागरिकांना वेळोवेळी माहिती देणे गरजेचे होते. परंतु प्रशासनाकडून कोणतीही माहिती रोहेकर नागरिकांना देण्यात येत नसल्यामुळे रोहा शहराचा पाणी पुरवठा केव्हा सुरळीत सुरू होईल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
रोह्याचा पंचतारांकित विकास करताना रस्ते, पाणी, विज या मूलभूत सुविधा निर्माण करण्याकडे मात्र सत्ताधारी वर्गाचे पुरते दुर्लक्ष झाल्याबाबतचा असंतोष शहरातील नागरिकांमध्ये खदखद आहेत.

Exit mobile version