| पनवेल | प्रतिनिधी |
ही लढाई खर्या अर्थाने धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती. परंतु, माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र एक करुन प्रचार केला. जय-पराजयाने खचून न जाता पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागणार आणि उत्साहाने जनतेसमोर जाणार असा निर्धार पनवेल मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी केला.
विधानसभेच्या निकालानंतर बाळाराम पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, माझ्यासोबत दुसर्या फळीतील तरुणांची फौज रस्त्यावर उतरून प्रचार यंत्रणा हातात घेऊन गावोगावी शिट्टी ही निशाणी पोहोचण्यात मग्न होती. पनवेलमधील अनेक समस्यांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. अर्धवट केलेली विकास कामे, नैना प्रश्न, मालमत्ता कर यावर लक्ष दिले. मात्र, तरीही पराभव पत्करावा लागला. हार न मानता आपल्यावर ज्या 1 लाख 32 हजार 840 मतदारांनी विश्वास टाकला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी त्याच सर्व तरुण कार्यकर्त्यांची फौज घेऊन पुन्हा जोमाने काम करणार असल्याचे बाळाराम पाटील यांनी म्हणाले.
पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.
बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या.तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसर्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. 8 वाजता टपाल मतदानाची सुरुवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पहिल्या फेरीत बाळाराम पाटील यांनी 3 हजार 612 मतांनी आघाडी घेतल्याने बाळाराम पाटील पहिल्या फेरीपासून आघाडीवर होती. बाळाराम पाटील यांची ही आघाडी पाच फेर्या पर्यंत टिकवण्यात त्यांना यश मिळाले. दुसर्या फेरीत 7 हजार 836 मताची त्यांनी आघाडी मिळवली, तिसर्या फेरीत बाळाराम पाटील यांची ही आघाडी काहीशी कमी होताना दिसून आली. तिसर्या फेरीत त्यांनी 6,231 मतांची आघाडी मिळवली त्या नंतर चौथ्या फेरीत त्यांनी पुन्हा 6 हजार 971 मताची आघाडी घेत आघाडी कायम ठेवली आहे. मात्र ही आघाडी पाचव्या फेरीत 654 वर आली.