तटकरे, गोगावले की अन्य कोण?; रायगडकरांच्या लागल्या नजरा
| रायगड | खास प्रतिनिधी |
राज्यात महायुतीचे सरकार आता बर्यापैकी विसावले आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यांना खात्यांचे वाटपही झाले आहे. मात्र, अद्यापही पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रायगडचा पालकमंत्री कोण, हा प्रश्न रायगडवासियांना सतावत आहे. प्रजासत्ताक दिन जवळ येत आहे. प्रथेनुसार पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात येतो. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले अथवा महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे की अन्य कोणाचे नाव पुढे येते, याकडे रायगडवासियांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपा, शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये काही नावांवर अद्याप एकमत न झाल्याने पालकमंत्री कोण याचे भिजत घोंगडे पडले आहे. जिल्ह्यावर एकहाती एकाधिकारशाही गाजवता येते, सर्व यंत्रणा पालकमंत्र्यांच्या इशार्यावर सहज काम करतात. त्यामुळे पालकमंत्रीपदाचे महत्त्व अधोरेखित होते. महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत पालकमंत्रीपदावर आदिती तटकरे यांचीच वर्णी लागली होती. तटकरे यांच्या वाढत्या हस्तक्षेपाला कंटाळून जिल्ह्यातील तीन आमदारांनी तटकरे यांच्याविरोधात बंड केले होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. पुढे पालकमंत्रीपदाची जबाबदारी शिंदे शिवसेनेचे उदय सामंत यांच्याकडे आली.
2024 च्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला धूळ चारली खरी; मात्र अद्यापही मंत्र्यांचे खातेवाटप, पालकमंत्री यावरुन सातत्याने धुसफूस सुरु आहे. सध्या रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यामध्येच सुप्त संघर्ष सुरु आहे. दोघांच्या समर्थकांकडून दावा करण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणाचेच नाव जाहीर करण्यात आलेले नाही. आयत्या वेळी मंत्री गोगावले आणि मंत्री तटकरे यांच्या नावांव्यतिरिक्त अन्य कोणाचे नाव पुढे येते का, हा प्रश्न आहे. तसे झाल्यास दोघांच्या समर्थकांसाठी हा फार मोठा झटका ठरणार आहे.