दरवर्षी पाच हजार बसप्रमाणे पाच वर्षात 25 हजार बस देणार
| माणगाव | प्रतिनिधी |
एसटी ही राज्याची रक्तवाहिनी आहे. दरवर्षी पाच हजार नवीन बस गाड्यांप्रमाणे पुढील पाच वर्षात 25 हजार नवीन बस देणार आहे. तसेच कर्मचार्यांना भेडसावणार्या मूलभूत सोयी सुविधा देऊन समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, एसटीला नजीकच्या काळात अधिक सक्षम करणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माणगाव येथे पार पडलेल्या अधिवेशनात बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले की, राज्यात 12,400 गाड्या आहेत. एवढ्याच गाड्या परिवहन खात्याकडे असतील तर एसटी कशी चालवायची, असा प्रश्न मला पडला होता. त्यातील 50 गाड्या अशा आहेत की, त्यातील काही गाड्या दहा दिवसानंतर जरी भंगारात टाकल्या तरी भंगारवाले त्या गाड्या घेण्यासाठी पुढे मागे पुढे पाहतील, अशीच परिस्थिती असल्याने चालक वाहक वैतागले आहेत, अशी स्थिती आहे. जर 2029 व 2030 पर्यंत 25 ते 30 हजार गाड्या आपल्याकडे आल्या तर परिवहन महामंडळ फायद्यात आणल्याशिवाय राहणार नाही.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे 57 वे राज्यव्यापी अधिवेशन माणगाव येथील अल्ताफदादा धनसे यांचे मैदानात 5 मे सोमवारी सायंकाळी सहा वाजता पार पडले. त्यावेळी व्यासपीठावर उद्घाटक उद्योगमंत्री उदय सामंत, कार्यक्रमाचे अध्यक्ष परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, अधिवेशनाचे अध्यक्ष संदीप शिंदे, प्रमुख निमंत्रक हनुमंत ताटे, प्रमुख अतिथी रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खा. सुनील तटकरे, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, माजी आ. रवींद्र धंगेकर यांच्यासह महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ना. सरनाईक म्हणाले की, संघटनेची मागणी महागाई भत्त्याची आहे. त्यासाठी 19 कोटी रुपये दरमहा खर्च आहे. तो कुठून आणायचा असा प्रश्न उपस्थित करीत म्हणाले की, एसटी कर्मचारी संघटनेची मागणी राज्य सरकारी कर्मचार्यांना 56 टक्के महागाई भत्ता दिला जातो. मात्र, रात्रंदिवस काम करणार्या एसटी कर्मचार्यांना मात्र 46 टक्के महागाई भत्ता दिला जातो. राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणे हा भत्ता एसटी कर्मचार्यांनाही द्यावा, ही मागणी कोर्टानेही मान्य केली आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पदाधिकारींची बैठक याच महिन्यात बोलावून निर्णय बसून घेऊ, अशी ग्वाही दिली. तसेच महिलां कर्मचार्यांना सायंकाळी आठ वाजेपर्यंत ड्युटी द्यावी, असे आदेश व्यासपीठावर तात्काळ दिले. यावेळी परिवहन मंत्री ना. सरनाईक यांनी माणगाव बस स्थानक व डेपोला भेट देऊन तेथील स्वच्छतागृहाची, कर्मचार्यांच्या विश्रांतीगृहाची तसेच बस स्थानकात काँक्रिटीकरणाच्या कामाची पाहणी केली. बस स्थानकातील काँक्रिटीकरणाचे काम उत्कृष्ट नसल्याने उदय सामंत यांना माहिती दिली. त्यामुळे सामंत यांनी एमआयडीसीचे अभियंता यांना संबंधित ठेकेदाराला सूचना देऊन ते काम व्यवस्थित करण्याचे सांगितले अन्यथा ब्लॅक लिस्टमध्ये अशा ठेकेदाराचे नाव टाका असे ते म्हणाले. या अधिवेशनाची संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष विलास खोपटे, विभागीय सचिव गणेश शेलार व सहकारी कर्मचारी यांनी जोरदार तयारी केली होती.