| पनवेल | वार्ताहर |
भिंगारी गाव येथील पनवेलकडे येणार्या सर्विस रोडवर महावितरणच्या कार्यालयाजवळ भरधाव वेगाने आलेल्या कारने इलेक्ट्रिक स्कुटीला दिलेल्या धडकेत दोघेजण जखमी झाले होते. यातील सुशील दत्ताराम पवार याचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी किया कार क्रमांक एमएच 05 ईए 5193 वरील चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सचिन कोनकर (रा. काळुंद्रे गाव) हा आणि त्याचा मित्र सुशील पवार (28) हे काळुंद्रे गाव येथून पनवेल येथे मित्राच्या घरी कामानिमित्त इलेक्ट्रिक स्कुटी क्रमांक एमएच 46 सीजे 1817 वरून रात्री पावणे बाराच्या सुमारास जात होते. भिंगारी गाव येथील पनवेलकडे येणार्या सर्विस रोडवर महावितरण कार्यालयाजवळ आले असता समोरून येणार्या किया कार क्रमांक एमएच 05 इए 5193 या कारवरील चालकाने भरधाव वेगाने येऊन स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात सचिन याच्या हाताच्या खांद्याला व उजव्या पायाच्या मांडीला दुखापत झाली, तर सुशील पवार हा जखमी झाला. त्यांना उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे दाखल करण्यात आले. या अपघातात सुशील पवार याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.