। खेड । प्रतिनिधी ।
खेड तालुक्यातील भरणे येथे चोरद नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. देवेंद्र दिलीप राणे (26, रा. तुळशी बुद्रुक, ता खेड) असे मृत तरुणाचे नाव असून तो आपल्या बहिणीच्या लग्नासाठी मुंबईहून गावी आला होता, मित्रांसोबत नदीत पोहण्यासाठी गेला असताना ही घटना घडली.
देवेंद्र हा मुंबईहून आपल्या बहिणीच्या लग्नासाठी गावी आला होता. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास तो खेड तालुक्यातील भरणे येथे चोरद नदीपात्रात ओझरडोह येथे मित्रांबरोबर पोहण्यासाठी गेला होता. यादरम्यान पोहण्यासाठी मारलेल्या उडीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्या आधीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.