। सांगली । प्रतिनिधी ।
मोबाईल स्क्रीन गार्डच्या वादातून एका मोबाईल दुकानदार तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगली येथे घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपींना सांगली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विपुल याचे सांगलीच्या एसटी स्टँड नजीक विपुल भैरवनाथ मोबाईल शॉपी आहे. याच मोबाईल दुकानात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चार अल्पवयीन तरुण मोबाईलचा स्क्रीन गार्ड खरेदी करण्यासाठी पोहोचले. विपुलने मोबाईलचा स्क्रीन गार्ड दाखवले. मात्र, स्क्रीन गार्ड किंमत ऐकल्यावर अल्पवयीन तरुणांना हटकले, बाजारात पन्नास रुपयाला स्क्रीन गार्ड मिळत असताना शंभर रुपये किंमत कशी? असा प्रश्न केला आणि यातून शिवीगाळ सुरू झाली. काही क्षणातच स्क्रीन गार्ड खरेदीसाठी आलेल्या चौघांनी आपल्या जवळ असणारी धारदार शस्त्र काढली आणि मोबाईल दुकानदारावर एका मागून असे वीस-पंचवीस वार करण्यात आले. यात विपुल गोस्वामी याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह पोलीस पथकाने ठाव घेत गतीने तपास सुरू केला आणि काही वेळातच त्या संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले.