| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
इर्शाळगडावरून माची प्रबळगडाच्या दिशेने ट्रेकसाठी निघालेल्या ठाण्यातील टीसीएस कंपनीत कार्यरत 13 तरुणांचा गट दाट जंगलात भरकटल्याने एकच खळबळ उडाली. अंधार, निसरडे कातळ, खोल दऱ्या आणि मोबाईल नेटवर्क नसल्याने ट्रेकर्स गंभीर संकटात सापडले होते. मात्र, आपत्कालीन 112 क्रमांकावर मदतीचा कॉल मिळताच पनवेल तालुका पोलिसांसह स्थानिक वाटाडे, निसर्ग मित्र संस्था आणि हेल्प फाउंडेशनने संयुक्त बचाव मोहीम राबवत सर्व 13 ट्रेकर्सची सुखरूप सुटका केली.
पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट मार्शल-4 वरील नितीन सोनवणे व प्रदीप पोपटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मदतीला माची प्रबळ गावातील अनुभवी वाटाडे नवनाथ पारधी, हरिश्चंद्र पारधी व नथुराम पारधी यांच्यासह पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे तीन अधिकारी व सात पोलीस कर्मचारी सहभागी झाले. तसेच निसर्ग मित्र संस्थेचे सचिन शिंदे, वरद पवार, हेमंत वैद्य, अक्षय देशमुख आणि हेल्प फाउंडेशनच्या रेस्क्यूअर्सनीही बचाव मोहिमेत मोलाची भूमिका बजावली.
रात्र वाढत असताना दाट जंगलातून मार्ग काढणे हे बचाव पथकापुढील मोठे आव्हान होते. अनेक ठिकाणी एका चुकीच्या पावलाने शेकडो फूट खोल दरीत कोसळण्याचा धोका असतानाही बचाव पथकाने शोधमोहीम सुरू ठेवली. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर भरकटलेल्या ट्रेकर्सपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित मार्गाने एकामागोमाग एक खाली आणण्यात यश आले.
सुटका करण्यात आलेल्या ट्रेकर्समध्ये आदित्य विचारे, प्रकाश सावंत, यतीन कालिया, ऋतुराज पाटील, अंकित मिश्रा, दीपक बनकर, अभिषेक बहादूरकर, दीपक कुमार राजदेव महतो, अनिकेत दुबे, चेतन शिंदे, राहुल बनकर, प्रशांत पांचोरे आणि रोहित कुमार यांचा समावेश आहे. हे सर्वजण ठाणे येथील टीसीएस कंपनीत कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वेळीच मिळालेल्या मदतीमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. जीवाची पर्वा न करता राबविण्यात आलेल्या या धाडसी संयुक्त बचाव मोहिमेबद्दल पनवेल तालुका पोलीस, स्थानिक वाटाडे, निसर्ग मित्र संस्था आणि हेल्प फाउंडेशनच्या रेस्क्यूअर्सवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.






