| उरण | प्रतिनिधी |
उरण शहरातील लाल मैदान परिसरात बुधवारी (दि.17) सायंकाळी उरण पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका तरुणाकडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे ‘हेरॉईन’ जप्त केले. या प्रकरणी करंजा येथील एका तरुणाला अटक करण्यात आली असून, या कारवाईमुळे उरण परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल मैदान परिसरात एक संशयित तरुण फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उरण पोलिसांनी त्याची चौकशी व झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडून फिकट तपकिरी रंगाच्या पावडरच्या पुड्या आढळून आल्या. तपासणीअंती हा पदार्थ ‘हेरॉईन’ असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी महंमद हुसेन अक्रम शेख (33) रा. करंजा, उरण याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 6.40 ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत 2 लाख 56 हजार रुपये असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांनी दिली.
उरण परिसरात अमलीपदार्थांचे सेवन व विक्री होत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलिसांकडून अमलीपदार्थविरोधी कारवाया सुरू करण्यात आल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
कारवाईनंतर उरण परिसरात अमलीपदार्थांच्या संभाव्य मोठ्या जाळ्याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. जप्त करण्यात आलेला साठा हा केवळ वरवर समोर आलेला भाग असून, परिसरात अमलीपदार्थांचा मोठ्या प्रमाणात साठा व व्यवहार सुरू असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये आहेत. मात्र, या चर्चांना अद्याप पोलिसांकडून किंवा संबंधित तपास यंत्रणांकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, तपासातूनच या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे.







