कोंडीचा धबधबा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण
| रेवदंडा | प्रतिनिधी |
पावसाळ्याच्या आगमनानंतर रायगड जिल्ह्यातील डोंगर-दऱ्या, हिरवागार निसर्ग आणि ओसंडून वाहणारे धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहेत. त्यामुळे शनिवार-रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. धुक्याची चादर, हिरव्यागार दऱ्या, खळाळणारे धबधबे आणि गार वाऱ्याचा आनंद घेण्यासाठी कुटुंबीय, मित्रमंडळी तसेच तरुणाई मोठ्या प्रमाणात वर्षा सहलीचे नियोजन करत आहेत. यामुळे पर्यटनस्थळांवरील हॉटेल्स, होमस्टे, रिसॉर्ट्स आणि स्थानिक व्यावसायिकांनाही आर्थिक चालना मिळत आहे.
अलिबाग तालुक्यातील बेलोशीजवळील सागवाडी (ठाकूरवस्ती) परिसरातील कोंडीचा धबधबा यंदाही पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. अलिबागपासून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या या धबधब्यापर्यंत जंगलातील रम्य पायवाटेने 20 ते 25 मिनिटांचा पायी प्रवास करावा लागतो. निसर्गाच्या कुशीत वसलेला हा धबधबा आणि परिसरातील शांत वातावरण पर्यटकांना वेगळाच अनुभव देत आहे.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात 2021मध्ये स्थानिक कलाकार महेंद्र गावंड (कलातरंग, बेलोशी) यांनी मित्रांच्या सहकार्याने धबधब्याजवळील विशाल दगडांवर आकर्षक चित्रकला साकारली. प्रचंड दगडावर रंगवलेले वाघाचे भव्य मुख, तसेच सिंह, अजगर, गरुड, मासा, कासव आणि टायटॅनिक जहाजाची चित्रे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत. या कलाकृती सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर कोंडीचा धबधबा अधिक चर्चेत आला.
दरम्यान, वर्षा सहलीचा आनंद घेताना पर्यटकांनी सुरक्षिततेचे भान राखावे, धबधब्यांमध्ये अति साहस करू नये, नदी-ओढ्यांच्या वेगवान प्रवाहात उतरू नये, घसरड्या कड्यांवर सेल्फी घेणे टाळावे तसेच परिसर स्वच्छ ठेवून प्लास्टिकमुक्त पर्यटनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ग्रामीण पर्यटनाला नवी दिशा
पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे सागवाडी ठाकूरवस्तीतील स्थानिक नागरिकांनी पार्किंग, चहा-नाश्ता, खाद्यपदार्थ विक्री तसेच इतर लघुउद्योग सुरू केले आहेत. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या असून कला, निसर्ग आणि ग्रामीण पर्यटनाचा सुंदर संगम घडवून आणणारा कोंडीचा धबधबा अलिबाग तालुक्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळख निर्माण करत आहे.







