नुकसान भरून काढण्यासाठी प्रभावी योजना; शेतकऱ्यांना विमा उतरविण्याचे आवाहन
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात खरीप हंगामात भाताची शेती तसेच नाचणी आणि वरी यांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु, वातावरणातील बदल आणि लहरी हवामान यामुळे खरीप हंगामातील शेती संकटात आली आहे. त्याबाबत शासनाने “जुलै अखेरपर्यंत आपल्या पिकाचे विमा उतरावा”, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे व कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) दिनेश कुमार कोळी यांनी केले आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत कर्जत तालुक्यातील भात व नाचणी पिकांसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. दि.31 जुलै ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, दुष्काळ, वादळ, कीड व रोगांमुळे पिकांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांसाठी प्रभावी आर्थिक सुरक्षा कवच ठरणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार कर्जत तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळामध्ये संबंधित पिकाचे चालू हंगामातील सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी झाल्यास पात्र शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.
कर्जत तालुक्यात भात व नाचणी ही अधिसूचित पिके असून, या योजनेची अंमलबजावणी इफ्को टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत करण्यात येत आहे. कर्जत तालुक्यातील सर्व भात व नाचणी उत्पादक शेतकरी यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत दि.31 जुलैपूर्वी सहभागी होऊन आपल्या पिकाला आर्थिक सुरक्षा कवच प्रदान करावे. अधिक माहितीसाठी संबंधित आपले गावाचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी कर्जत-कशेळे किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय-कर्जत येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरी हप्ता व विमा संरक्षण
भातः
शेतकरी हप्ता- 650 रुपये प्रति हेक्टर
संरक्षित रक्कम- 65 हजार रुपये प्रति हेक्टर
नाचणीः
शेतकरी हप्ता- 400 रुपये प्रति हेक्टर
संरक्षित रक्कम- 40 हजार रुपये प्रति हेक्टर
अर्ज कुठे करावा?
शेतकरी बँक, कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा केंद्र शासनाच्या अधिकृत पीक विमा पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. तसेच, अर्ज करण्यासाठी 7/12 व 8-अ उतारा, ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, आधार कार्ड, पीक लागवड घोषणापत्र, आधारशी संलग्न बँक खाते आणि भाडेतत्त्वावरील जमीन असल्यास नोंदणीकृत भाडेकरार या कागदपत्रांची आवश्यकता आहे.







