| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातून रोहा, श्रीवर्धन व पुण्याकडे जाणारा जवळचा राजपूरी-खोकरी रस्त्या मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याच्या दरम्यान समुद्र किनाऱ्यालगतचा संरक्षक कठडा गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात कोसळल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे. वेळोवेळी या ठिकाणी तातडीने योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक व प्रवासी वर्गातून केली जात आहे. परंतु, यंदाचा पावसाळा उजाडला तरी कोणतीही दुरुस्ती करण्यात न आल्याने त्यांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे राजपूरी-खोकरी दरम्यान समुद्र किनाऱ्यालगतचा संरक्षक कठडा कोसळला होता. हा संरक्षक कठडा दुरूस्त व योग्य ती उपाययोजना करण्याबाबत राजपूरी ग्रामपंचायतीतर्फे मुरुडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही या ठिकाणी कोणतीही उपाययोजना न करण्यात आल्याने वेळप्रसंगी अपघाताची शक्यता भिती व्यक्त केली जात आहे. याबाबत गेल्या महिन्यात कृषीवलच्या प्रतिनिधीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता, राजपुरी-खोकरी दरम्यान समुद्र किनाऱ्यालगतचा संरक्षक कठडा बांधण्यात वरीष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. परंतु, अद्यापही या कामासाठी निधी प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात आले होते. आता मे महिना उलटून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात देखील झाली, तरी या ठिकाणी संरक्षक कठडा बांधण्यात न आल्याने वाहनचालक व प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.







