विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचा रस्ताच नाही; कौलोशी आदिवासीडीतील चिमुकल्यांचे शिक्षण धोक्यात
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील कौलोशी आदिवासीवाडीतील शाळकरी मुलांच्या शिक्षणासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी हक्काचा रस्ताच उपलब्ध नसताना एका विकासकाने उभारलेल्या कंपाऊंडमुळे मुलांची मुख्य वाट बंद झाली आहे.
सध्या विद्यार्थी एका अरुंद पायवाटेने शाळेत जात असले तरी पावसाळ्यात ही वाटही चिखलमय होऊन बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिमुरड्यांनी शाळेत जायचे कसे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत असून, मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवला नाही तर आंदोलनाचा इशारा मनसेने दिला आहे.
शिक्षणाचा हक्क देण्याच्या गप्पा मारणारे प्रशासन आदिवासी मुलांचा रस्ताच मोकळा करू शकत नसेल तर ती शरमेची बाब आहे. आम्ही प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विकासकाला मनसे स्टाईलने दणका देऊ. मुलांच्या शिक्षणाशी कुठलाही खेळ खपवून घेतला जाणार नाही.
सुनील साठे,
अध्यक्ष, मनसे सुधागड तालुका







