| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चिरनेर या गावात गतवर्षी 26 मे रोजी सकाळी अचानक आलेला पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे येथील चौलकर कुटुंबीयांच्या घराचे छप्परच उडाले होते. दुर्घटनेच्या रात्री चौलकर कुटुंबाच्या तिन्ही भावांची कुटुंबे कार्यक्रमानिमित्ताने नातेवाईकांकडे बाहेरगावी गेली असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, घराच्या संपूर्ण छपराबरोबर घरातील टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन यासारख्या व अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच सोपा, बेड, कपडे व अन्नधान्यासह तयार करण्यात आलेल्या गणेश मूर्तींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तर, गावातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी व घरांच्या भिंतींची पडझड होऊन, नुकसान झाले होते. पावसाने चिरनेर गावांना अक्षरशः झोडपून काढले होते. मात्र, वादळी पावसातील घरांच्या घटनेला 8 महिने उलटून गेले तरी अजून शासनाची नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून जनतेप्रती शासनाची संवेदनशीलता संपली का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.







