| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी आणि नागरिक हैराण झाले असून, स्टेशनसमोरील मोठ्या सर्कलचा घेर कमी करण्याची मागणी जोर धरत आहे. सर्कलचा आकार कमी केल्यास उपलब्ध जागेचा अधिक परिणामकारक वापर होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असा नागरिकांचा विश्वास आहे.
पनवेल रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर रिक्षांची गर्दी होत असून, अनेक रिक्षाचालक कुठेही वाहन उभे करतात. याशिवाय सर्कललगत बेकायदेशीररित्या चारचाकी टॅक्सी उभ्या राहत असल्याने कोंडीत अधिक भर पडते. अधिकृत थांबा नसतानाही या वाहनांची वाढती संख्या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. दररोज हजारो प्रवासी पनवेल स्थानकातून प्रवास करत असल्याने परिसरात कायमच मोठी वर्दळ असते.
मात्र वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींमुळे अनेकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची स्थिती आहे. रिक्षाचालकांशी भाड्यावरून वाद होणे, कागदपत्रांची पूर्तता नसताना व्यवसाय करणारे चालक यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.या पार्श्वभूमीवर आरटीओ आणि पनवेल वाहतूक विभागाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे. तसेच स्टेशन परिसरात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नियुक्त करून नियंत्रण ठेवावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. पनवेल रेल्वे स्थानकासमोरील सर्कलचा घेर कमी करून जागेचा योग्य वापर केल्यास वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल, असे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.







