तीन तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत
| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी |
दिवेआगर येथील माऊली हॉटेलजवळील ट्रान्सफॉर्मर परिसरात डब्ल्यूआयपी केबलमध्ये बिघाड निर्माण झाल्याने वीजपुरवठा अचानक खंडित झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक तसेच हॉटेल व्यवसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अंसारी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक टीमने परिस्थितीचा आढावा घेत केबलमधील दोष शोधून काढला. सुमारे तीन तासांच्या सातत्यपूर्ण आणि अथक प्रयत्नांनंतर बिघाड दुरुस्त करण्यात यश आले आणि वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.
या दुरुस्ती कामात अंसारी यांच्यासह प्रसाद वाणी, चेतन पाटील, सौरभ तोडणकर, राजभर (लाईनमन) तसेच संपूर्ण टीमने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यामध्ये चेतन पाटील यांचे विशेष योगदान उल्लेखनीय ठरले. बिघाडाचे अचूक निदान करून तांत्रिक दुरुस्ती प्रक्रियेत त्यांनी पुढाकार घेतला व टीमला प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि कौशल्यपूर्ण कामगिरीमुळे कमी वेळेत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात मोठी मदत झाली.त्यांच्या तत्परतेमुळे आणि समन्वयामुळे मोठा अनर्थ टळला असून, स्थानिकांना दिलासा मिळाला आहे. या घटनेनंतर दिवेआगर येथील स्थानिक नागरिक व हॉटेल व्यावसायिकांनी संबंधित टीमचे मनापासून आभार व्यक्त केले असून, अशा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणाऱ्या यंत्रणेचे कौतुक केले आहे.







