| पनवेल | प्रतिनिधी |
पावसाळा तोंडावर आला असताना पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अनेक मोठ्या नाल्यांची अद्यापही पूर्णपणे साफसफाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः नवीन पनवेलमधील सेक्टर 17, सेक्टर 19 तसेच सेक्टर 6 परिसरातील रहिवाशांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.
दरवर्षी मुसळधार पावसामुळे नवीन पनवेलमधील विविध सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. रस्ते जलमय होत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होते. शाळकरी मुलांना शाळेत ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतो, तर वाहनधारकांनाही वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका निर्माण होतो. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मोठ्या नाल्यांची साफसफाई पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. वेळेत नालेसफाई न झाल्यास यंदाही पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.







