। अलिबाग । वार्ताहर ।
सिद्धीविनायक क्रीडामंडळ गरुडपाडा यांच्या वतीने आणि रायगड जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने स्व.प्रविण भास्कर कदम यांच्या स्मरणार्थ रविवारी एकदिवसीय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये म्हसोबा पेझारी संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत जिल्ह्यातील निमंत्रित 32 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन अनिल पाटील शेकाप तालुका चिटणीस यांच्या हस्ते करण्यात आले. आ. जयंत पाटील यांनी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यासमवेत अलिबाग अर्बन बँकेच्या चेअरमन सुप्रिया पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, दिलीप भोईर समाजकल्याण सभापती, कावीर सरपंच राजेंद्र म्हात्रे, प्रफुल्ल द्वरकानाथ नाईक सकल मराठा समाज सर्व पदाधिकारी तसेच विभागातील राजकीय, सामाजिक क्रीडा क्षेत्रातील पदाधिकारी आणि प्रविण कदम कुटुंबिय आणि मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपसित होते.
या स्पर्धेमध्ये म्हसोबा पेझारी प्रथम क्रमांक, द्वितीय श्री विठ्ठल कोपरपाडा, तृतीय श्री गणेश आधाड, चतुर्थ मिडलाईट कर्जत यांनी पटकाविले. तसेच सर्वोकृष्ट खेळाडू मितेश पाटील म्हसोबा पेझारी, उत्कृष्ट पकड सचिन पाटील कोपरपाडा, उत्कृष्ट चढाई अजिंक्य पाटील श्री गणेश आधाड यांनी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
- स्व. प्रविण कदम यांनी अनेक सामाजिक कामे केली. त्यांनी केलेल्या कार्यामुळे कार्यकर्त्यांची एक चांगली फळी निर्माण झाली. गेली अनेक वर्षे याठिकाणी शिस्तबद्ध व नियमांत राहून कबड्डी स्पर्धा भरविली जाते. कबड्डीच्या माध्यमातून या विभागात सर्वाधिक प्रेक्षक जमविण्याचे काम अनिल पाटील करीत आहेत. जिल्ह्यात मॅटवर कबड्डी खेळली गेली पाहिजे. यासाठी वारंवार पाठपुरावा केला जात आहे. तसेच लाईट व्यवस्थाही दर्जेदार असणे आवश्यक आहे. भविष्यात कबड्डी ऑलिंम्पिकमध्ये नेण्याचा मानस आहे. त्यासाठी प्रयत्नही सुरु आहेत. कबड्डी यापुर्वी खारेपाटात मोठ्या प्रमाणात खेळली जात होती. मात्र आता संपुर्ण रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने खेळाडू खेळत आहेत. त्यामुळे आपल्या मातीतील या खेळासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य नक्कीच करण्यात येतील. – आ. जयंत पाटील, सरचिटणीस, शेकाप
स्व. प्रविण कदम यांना श्रद्धांजली
सिध्दीविनायक क्रिडा मंडळ गरुडपाडा यांच्यावतीने आणि रायगड जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने स्व. प्रविण भास्कर कदम यांच्या स्मरणार्थ रविवारी (दि.19) एकदिवसीय जिल्हास्तरीय कबडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शेकाप आ. जयंत पाटील, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्या उपस्थितीत मंडळाचे पदाधिकारी व खेळाडूंनी मेणबत्ती पेटवून प्रविण कदम यांना श्रद्धांजली वाहिली.