भाजपाच्या पदरी निराशा
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकलाअ असून, नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या आफरीन करोल तर उपनगराध्यक्षपदी मंदार शिरसाट यांची निवड करण्यात आली आहे.
कुडाळ नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेना-काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली. शिवसेना 7 आणि काँग्रेसला 2 असे मिळुन 9 सदस्य होते, तर भाजपकडे 8 सदस्य आहेत. दोन्ही बाजुकडुन नगराध्यक्ष आपलाच होणार असल्याचा दावा केला जात होता.
शिवसेना-काँग्रेस महाविकास आघाडीकडुन आफरिन करोल तर भाजपकडुन प्राची बांदेकर रिंगणात उभ्या होत्या. तर उपनराध्यक्ष पदासाठी महाविकाआघाडीकडुन शिवसेना गटनेते मंदार शिरसाट तर भाजपकडुन निलेश परब यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
अखेर अपेक्षित संख्याबळाप्रमाणे महाविकास आघाडीची सत्ता आली. सत्ता येताच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
दरम्यान, कुडाळ नगराध्यक्ष निवडणुकीच्या काही मिनिटांआधी नगरपंचायत समोरील रोडवर शिवसेना-भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आमदार वैभव नाईक यांची गाडी शिवसेना-काँग्रेस नगरसेवकांना घेवून आत आल्याने शाब्दिक बाचाबाची होवून दोन्ही गटात फ्री स्टाईल झाली.
यावेळी पोलिसांनी दोन्ही गटांना थोपवण्यासाठी लाठीचा प्रसाद दिला. एकुणच यावेळी वातावरण तंग झाल्याने परिणामी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सर्वच पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना शंभर मीटर बाहेर काढल्यानंतर नगरपंचायत परिसर शांत झाला.