| पनवेल | वार्ताहर |
खरेदी केलेल्या रूमचे बांधकाम व्यावसायिकाने रजिस्ट्रेशन करून न देता, या रूममध्ये बेकायदेशीरपणे दुसराच व्यक्ती राहत असल्याचे माहित झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिक कल्पेश ज्ञानेशर कोनकर, रा.चक्की नाका, कल्याण याच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शब्बीर हजारी दिन हे कल्याण, चक्की नाका येथे राहत असून, त्यांनी कीमया बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या चिंचवली तर्फे वाजे याठिकाणी चाळीच्या प्रोजेक्टमध्ये वर्ष 2020 मध्ये रूम नंबर -1 हा बुक करून खरेदी केला. त्यासाठी कल्पेश कोनकर यांना साडेचार लाख रुपयांचा धनादेश आणि रोख स्वरूपात पैसे दिल्यानंतर घराचे रजिस्ट्रेशन करून देण्याबाबत विनंती केली असता, नंतर बघू असे सांगून कोनकर यांनी टाळाटाळ केली. आणि रजिस्ट्रेशन करून दिले नाही. दरम्यान, शब्बीर हे कल्याण येथे राहत असल्याने रूममधील पेंटिंग आणि दरवाजाचे काम करून त्यांनी लॉक लावले होते. मे 2024 मध्ये ते रूमवर गेले असता, रूममध्ये एक इसम बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून राहत होता, याबाबत इसमाकडे शब्बीर यांनी विचारणा केली असता, हा रूम मी खरेदी केला आहे असे त्याने शब्बीर यास सांगितले. या प्रकाराबाबत बांधकाम व्यावसायिक कल्पेश कोनकर यांना विचारणा केली असता, त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक कल्पेश कोनकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.