। नवी दिल्ली । प्रतिनिधी ।
पाकिस्तान क्रिकेट संघातील तीन खेळाडूंवर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. तिरंगी मालिकेत 12 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्याबद्दल तीन खेळाडूंना दंड ठोठावण्यात आला आहे. या तीन खेळाडूंमध्ये शाहीन आफ्रिदी, सौद शकील आणि कामरान गुलाम यांचा समावेश आहे.
वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला संहितेच्या कलम 2.12 चे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या सामना शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय, कामरान गुलाम आणि सौद शकील यांना संहितेच्या कलम 2.5 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले आहे. दोघांकडूनही मॅच फीच्या 10 टक्के रक्कम कापण्यात आली आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेतील तिसर्या सामन्याच्या 28 व्या षटकात शाहीन आफ्रिदी आणि मॅथ्यू ब्रिट्झके यांच्यात जोरदार वाद झाला. आफ्रिदीचा संयम सुटला आणि तो मॅथ्यूशी वाद घालायला गेला. यानंतर, पुढच्या चेंडूवर, जेव्हा मॅथ्यू ब्रीट्झके एक धाव घेत होता. तेव्हा या काळात आफ्रिदीने त्याला मुद्धाम अडवण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही खेळाडूंमध्ये शारीरिक संपर्क आणि जोरदार वाद झाला. यानंतर, 29 व्या षटकात टेम्बा बावुमा धावचीत झाला. दरम्यान, कामरान गुलाम आणि सौद शकील हे आनंद साजरा करण्यासाठी बावुमाजवळ पोहोचले.
दोन्ही खेळाडूंनी बावुमाला जवळून स्लेज मारण्याचा प्रयत्न केला. तथापि, बावुमाने खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केले आणि शांतपणे पॅव्हेलियनमध्ये परतला. आफ्रिदी, गुलाम आणि शकील यांच्या खात्यात प्रत्येकी एक डिमेरिट पॉइंट जोडण्यात आला आहे. गेल्या 24 महिन्यांत या खेळाडूंनी केलेला हा पहिलाच मैदानावरील गुन्हा आहे. सर्व खेळाडूंनी सुनावलेल्या शिक्षेचा स्वीकार केला आहे. या प्रकरणात आता कोणतीही औपचारिक सुनावणी होणार नाही.