ॲड. प्रदीप घरत यांच्या उपस्थितीत नवीन कार्यालयाचे उद्घाटन
| अलिबाग | प्रतिनिधी |
कायद्याच्या क्षेत्रात नवीन वाटचाल करणाऱ्या ॲड. ह्रितिका जन्नावर यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. मुंबईतील प्रख्यात ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तोडणकर गुरुजी, ज्येष्ठ पत्रकार अमर वार्डे, सहयोग व्यापारी नागरी पतसंस्था अध्यक्ष योगेश मगर, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, दत्ता भोपी, जितेश्री पाटील, अर्जुन पाटील, संतोष मोरे, अजय घरत, डॉ. प्रशांत जन्नावर व विशाखा जन्नावर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तोडणकर गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ॲड. ह्रितिका जन्नावर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आज एका महत्त्वाच्या मुहूर्तावर ॲड. ह्रितिका जन्नावर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. व्यवसायात उतरल्यावर अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही जो व्यवसाय निवडला आहे, त्यावर तुमची श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे.पुढे बोलताना त्यांनी, डॉ. प्रशांत जन्नावर यांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, डॉ. जन्नावर यांनी सरकारी रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम केले आणि त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन या सामाजिक कार्याला वाहून घेतले. त्यांचा ध्यास आणि लोकांचा त्यांच्यावरील विश्वास या गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या आहेत. त्यामुळे व्यवसायात काय करायला हवे, हे सांगण्याची त्यांना गरज नाही. डॉ. साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून ॲड. ह््रितिका यांचा व्यवसाय अत्यंत यशस्वीपणे चालेल, यात शंका नाही, असेही त्यांनी सांगितले.
कायद्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ॲड. ह्रितिका जन्नावर यांना सिम्बॉसिस विद्यापीठातून विधी पदवीमध्ये सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. या कामगिरीबद्दल भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता. विशेष सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत यांच्या हस्ते त्यांच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन झाल्यामुळे ॲड. ह्रितिका जन्नावर यांना त्यांचे मार्गदर्शन सतत लाभत राहील, असा विश्वासही अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यालयामुळे ॲड. ह्रितिका जन्नावर आपल्या कार्यात यशाचे शिखर गाठतील आणि समाजात मोठे नाव कमवतील, अशा शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या.







