| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील पालीसह परिसरात बुधवारी (दि.22) संध्याकाळच्या सुमारास अचानक वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पाली-खोपोली महामार्गावरील पाली शहराजवळ एक मोठा वृक्ष वाऱ्याच्या तीव्र झटक्यामुळे रस्त्यावर कोसळला. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र, रस्त्यावर अडथळा निर्माण झाल्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला.
ही बाब वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर जागरूक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शंतनू लिमये, प्रदीप गोळे, पोलीस कर्मचारी गायकवाड, राजेश ठाकूर आणि ऋषिकेश थळे यांनी तत्परतेने परिस्थिती हाताळली. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने पडलेले झाड रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आले. या कार्यवाहीमुळे वाहतूक सुरळीत सुरू झाली.जागरूक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या तात्काळ प्रतिसादामुळे मोठी दुर्घटना टळली असून त्यांच्या कार्यक्षमतेचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.







