180 रुग्ण; शुन्य मृत्यू
31 कोरोनामुक्त, जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गुरुवारी 99 रुग्ण आढळल्यानंतर आज पुन्हा दुसर्या दिवशी या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत सक्रीय रुग्णांची संख्या 618 वर पोहचली आहे. शुक्रवार दि. 31 डिसेेंबर रोजी कोरोनाच्या 180 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. तर दिवसभरात 31 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच 6 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. शुक्रवारी पनवेल महापालिका हद्दीत 108, पनवेल ग्रामीण 22, उरण 7, खालापूर 7, कर्जत 4, पेण 10, अलिबाग 12, माणगाव 2, रोहा 7, महाड 1 असे 180 रुग्ण आढळले. तसेच मुरुड, तळा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, आणि पोलादपूर या 6 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 73 हजार 112 झाली आहे. यापैकी 1 लाख 67 हजार 906 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 588 वर गेला आहे. सद्यस्थितीत 618 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.