बैठकांच्या माध्यमातून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी बंजारा समाज एकवटवणार आहे. रायगड जिल्हा सकल बंजारा आरक्षण समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी (दि.10) दुपारी दोन वाजता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची तयारी करण्यात आली असून, ठिकठिकाणी बैठका घेऊन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोर्चात 5 हजारहून अधिक बंजारा समाज सहभागी होणार असल्याचे प्रकाश राठोड यांनी सांगितले आहे.
सध्या बंजारा समाज विमुक्त जाती, काही राज्यांमध्ये अनुसूचित जमाती व काही राज्यांमध्ये इतर मागासवर्ग या प्रवर्गात समाविष्ट आहे. अनेक राज्यांमध्ये या समाजाचा समावेश अनुसूचित जमाती (एसटी) या वर्गात करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण टक्केवारीत स्वतंत्रपणे समावेश करण्यात यावे, या मागणीसाठी बंजारा समाजामार्फत मोर्चा काढण्यात येणार आहे. बंजारा समाजातील महिला-पुरुष, युवक व युवती असे असे 5 हजारहून अधिक नागरिक या मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चाला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सुुरूवात होणार आहे. सकल बंजारा आरक्षण समिती रायगड जिल्हा यांच्यावतीने मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा अलिबागमधील सेवालाल महाराज नाका कामगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बालाजी नाका, मारुती नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा असणार आहे. सुरुवातीला सेवालाल महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले जाणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने मोर्चाला सुरुवात होणार आहे.
या मोर्चाचे नेतृत्व प्रकाश राठोड, शंकर जाधव, अनिल राठोड, गोराम राठोड, लक्ष्मण पवार, माणिकशेठ, नारायण पवार, शिवराम राठोड, किशोर जाधव, रमेश जाधव, पांडू राठोड, राजू जाधव, भगवान पवार, मधुकर जोठात, रुपेश चव्हाण, विश्राताई जाधव, कुशाल राठोड, छगन राठोड, विजय चव्हाण, जगन्नाथ चव्हाण, भाऊसाहेब राठोड यांच्या मार्फत केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.







