गाळाची माती उद्यानासाठी वापरावी- भालचंद्र सावंत
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शहराला पाणीपुरवठा करणार्या शार्लोट लेकचे संवर्धन उपक्रमाला सुरुवात झाली आहे. पाच कोटी खर्चून शार्लोट लेक संवर्धन कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, या कामामध्ये तलावातील गाळ काढण्यात येत आहे. त्यावेळी काढण्यात आलेली गाळमिश्रित माती हि शहरातील उद्यानासाठी वापरण्यात यावी, अशी मागणी माथेरान शहरातील ज्येष्ठ नागरिक भालचंद्र सावंत यांनी केली आहे.
माथेरानमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याने येथील रस्त्यावरील आणि झाडांच्या मुळाशी असलेली माती प्रचंड वाहून जात असते. अशावेळी पावसानंतर पुन्हा रस्त्याची अथवा गार्डनची डागडूजी करण्यासाठी मातीची आवश्यकता असते. त्यावेळी आजूबाजूच्या जंगलात खोदकाम करून ती माती घ्यावी लागते. यामुळेही निसर्गाची हानी होतच असते. तसेच, या गोष्टीला वन खात्याने देखील विरोध केला आहे. सध्या माथेरानचे शार्लोट लेकमधील गाळ माती काढण्याचे काम सुरू आहे. शार्लोट लेकमधील खोदकाम सुरु असून त्यावेळी गाळमिश्रित सुपीक माती निघत आहे. त्यामुळे या सुपीक मातीचा माथेरानमधील दोन्ही उद्यानासाठी वापर करावा, अशी मागणी भालचंद्र सावंत यांनी माथेरान पालिकेकडे केली आहे.
भालचंद्र सावंत यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, माथेरानमध्ये माधवजी गार्डन तसेच पे मास्टर गार्डन असे दोनच उद्याने आहेत. खुप वर्षांपासून या दोन्ही उद्यानामध्ये हवा तसा बदल झालेला दिसत नाही. सध्या माथेरानचे शारलोट लेक तलावातील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तेथील माती गोणीत भरून त्याच परिसरात धूपप्रतिबंधक म्हणून वापर केला जात आहे. मात्र, या तलावातून निघालेली माती नगरपालिकेने माथेरानमधील दोन्ही गार्डनसाठी वापर केला तर उद्यानातील झाडे बहरण्यासाठी ते उपयुक्त ठरेल, असा विश्वस सावंत यांनी व्यक्त केला आहे.
शार्लोट तलावातील जी माती काढली जात आहे, ती माती शहरातील उद्यानांच्या संवर्धनासाठी वापरण्याची मागणी चांगली आहे. लेकमधून काढण्यात येणार्या मातीचा वापर येथील उद्यानातील झाडांसाठी व्हावा या मागणीचा सकारात्मक पद्धतीने विचार करण्यात येईल.
राहुल इंगळे,
मुख्याधिकारी, माथेरान नगरपरिषद