ईडीच्या आरोपपत्रात उल्लेख
| पुणे | प्रतिनिधी |
पत्राचाळ प्रकरणात आता माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही आरोपपत्रात ईडीने उल्लेख केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. यावरुन भाजपने आता पवारांनाच लक्ष्य करीत त्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे.
या आरोपपत्रातून दोन महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. 2006-2007 या कालावधीत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यामध्ये बैठक पार पडली होती. या बैठकीनंतरच गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून राकेश वाधवान यांच्याकडे पत्राचाळच्या विकासाचं काम देण्यात आलं होतं. पण हे माजी मुख्यमंत्री कोण होते याच्या नावाचा उल्लेख ईडीनं आरोपपत्रात केलेला नाही. या घोटाळ्यात 1 हजार 34 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं ईडीनं चार्जशीटमध्ये म्हटले आहे.
पत्राचाळ प्रकरणातील घडामोडींची माहिती संजय राऊत यांना होती. आणि तेच या घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार आहेत असंही ईडीनं आरोपपत्रात म्हटलं आहे. या घोटाळ्यात राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचंही ईडीनं आरोपपत्रात म्हटलं आहे.
याप्रकरणातल्या सहभागाविषयी शरद पवारांचीही चौकशी करण्याची मागणी भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. याबाबतीत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे.
मराठी माणसाला बेघर करणार्या पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणात गुरुआशिष कंपनीला काम देण्यात यावं, यासाठी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांच्या उपस्थितीत संजय राऊतांनी बैठक घेतली होती. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भातळखकरांनी आपल्या पत्रातून उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे.