अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये जाण्यास नकार
| अलिबाग | प्रमोद जाधव |
अन्यायकारक बदल्या झाल्याचा ठपका ठेवत 392 शिक्षकांपैकी 330 शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतू अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या शिक्षकांचे नव्याने समुपदेशन करण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी याबाबत पत्र दिले आहे. त्यामुळे येत्या 12 जूलै रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिक्षकांचे समुपदेशन केले जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झाली आहे.
कोरोनामूळे दोन वर्षे बदल्या रखडल्या होत्या. दिर्घ प्रतिक्षेनंतर जिल्ह्यात शिक्षकांची बदली प्रक्रिया वेगात सुरु झाली. जिल्ह्यातील एक हजार 639 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यांना कार्यमुक्त करण्याची प्रक्रियाही ऑनलाईन पद्धतीने सुरु केली. प्रत्येकाला घरबसल्या ऑनलाईनद्वारे बदल्यांची माहीती मिळाली आहे. त्यात जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील 392 शिक्षकांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. परंतू या बदल्यांवर 330 शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी बदल्यांविरोधात मुंबई येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सात जून रोजी सुनावणी होणार होती. त्यानंतरच या अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या करण्याबाबत भूमिका घेतली जाणार होती. या सुनावणीकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागून राहिले होते. परंतू ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी 26 सप्टेंबरला होणार आहे.
शाळा सुरु होऊन एक महिना होण्याच्या मार्गावर आहेत. शाळांमध्ये अपुरे शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाने विद्यार्थ्यांच्या नुकसानीचा मुद्दा घेत न्यायालयात गेलेले व न गेलेल्या अवघड क्षेत्रातील शिक्षकांचे समुपदेशन करण्याचे पत्र ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांनी जिल्हा परिषदेला दिले आहे. त्या पत्रानुसार जिल्ह्यातील न्यायालयात गेलेले व न्यायालयात न गेलेल्या अशा एकूण 392 शिक्षकांचे समुपदेशन बुधवार दि.12 जूलै रोजी होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांनी दिली.
न्यायालयात गेलेल्या व न्यायालयात न गेलेल्या शिक्षकांचे समुपदेशन करावे अशी लेखी सुचना उपसचिवांकडून आली आहे. त्यानुसार येत्या 12 जूलैला शिक्षकांचे समुपदेन केले जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे समुपदेशन होणार आहे.
पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी, रायगड जिल्हा परिषद