आवश्यक दाखले वेळेत मिळविण्यासाठी धावपळ
| खांब | प्रतिनिधी |
दहावी व बारावी परीक्षांचे निकाल काही दिवसांपूर्वीच लागले आहेत. तर आता पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून विविध शासकीय दाखले मिळविण्यासाठी सेतू कार्यालयात विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी वाढू लागली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महाविद्यालयीन प्रवेश, शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच विविध शासकीय योजनांसाठी उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, नॉन-क्रिमिलेयर, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, डोंगरी विभाग दाखला, अल्प भूधारक दाखला आदी दाखल्यांची आवश्यकता भासत असल्याने निकाल जाहीर झाल्यापासून दररोज सकाळपासूनच सेतू कार्यालयाबाहेर रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.
रखरखत्या उन्हाची पर्वा न करता पालक आणि विद्यार्थी आवश्यक दाखले वेळेत मिळविण्यासाठी धावपळ करत आहेत. काही ठिकाणी अर्ज भरणे, ऑनलाइन प्रक्रिया आणि कागदपत्र पडताळणी यासाठीही मोठी गर्दी होत असल्याने नागरिकांना तासन्तास प्रतिक्षा करावी लागत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करणे, स्वतंत्र मार्गदर्शन कक्ष सुरू करणे तसेच ऑनलाइन प्रक्रियेला अधिक गती देण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेची घाई सुरू झाल्याने पुढील काही दिवस सेतू कार्यालयांमध्ये अशीच गर्दी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







