मुख्याधिकार्यांकडून कारवाईचे भिजत घोंगडं
। अलिबाग। प्रतिनिधी ।
माणगाव येथील नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्यांचा अजब कारभार समोर आला आहे. घराच्या संरक्षण भिंतीलगत अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केल्याची तक्रार करूनदेखील हे प्रकरण लालफितीत अडकवून ठेवण्यात आले आहे. मुख्याधिकार्यांच्या या टोलवाटोलवीमुळे तक्रारदारांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. त्यामुळे न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्न जनमानसात उमटत आहे.
रामदास पुराणिक यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव नगरपंचायत हद्दीतील उतरेखोल (कचेरी रोड) येथील सर्व्हे नंबर 26/1/ ब 2( क्षेत्र 0-01-0) मध्ये पुराणिक यांच्या घराच्या संरक्षण भिंतीलगत कोणत्याही प्रकारचे सामायिक अंतर न सोडता विनापरवाना जांभ्या दगडांनी गाळ्यांचे बांधकाम केले आहे. याबाबत पुराणिक यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्या बांधकामावर हरकत त्यांनी घेतल्याने 12 जानेवारी 2024 मध्ये मुख्याधिकारी यांनी विनापरवाना करीत असलेले बांधकाम त्वरित थांबवावे आणि गाळ्यांचे बांधकाम स्वखर्चाने काढून टाकावे, अन्यथा नगरपंचायतीकडून हे बांधकाम काढण्यात येईल त्याचा सर्व खर्च वसूल केला जाईल, अशी नोटीस देत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनिअम, 1966 व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलमान्वये कारवाई करण्यात येईल. बांधकाम निष्कासित केले जाईल, असेही नमूद केले. परंतु, नोटीस देऊन एक वर्ष होत आले आहे, तरीदेखील नगरपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप पुराणिक यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून न्यायासाठी चपला झिजविण्याचे काम पुराणिक करीत आहेत. मात्र, नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याकडून कारवाईबाबत वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. माणगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्यांच्या या भूमिकेबाबत तक्रारदारांकडून तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत.
अतिक्रमण व बांधकामाविरोधात पुराणिक यांनी लेखी तक्रार केली. याबाबत नोटीस देण्यात आली आहे. दोन वेळा दोन्ही गटातील मंडळींना बोलावण्यात आले होते. परंतु, ज्यांच्याविरोधात तक्रार केली ते आले नाही. निंबाळकर यांनीदेखील तक्रार केली आहे. त्यामुळे दोघांना नोटीस देण्यात आली आहे. आठवड्यात हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.
संतोष माळी,
मुख्याधिकारी, माणगाव
सेवानिवृत्त तहसीलदार निंबाळकर यांनी नगरपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता माझ्या घराच्या संरक्षीत भिंतीला लागूनच दुकानाचे गाळे व स्वच्छतागृहाचे बांधकाम केले. त्यांनी नगर रचना विभागाच्या नियमांचे कोणतेही पालन केले नाही. नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना तक्रार अर्ज केला आहे. कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. परंतु, अद्यापपर्यंत त्यांच्याकडून ठोस कारवाई झाली नाही.
रामदास पुराणिक,
तक्रारदार
कचेरी रस्त्यालगत मालकीच्या एक गुंठे जागेत पत्र्याची शेड बांधली आहे. कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करून बांधकाम केले नाही. उलटपक्ष पुराणिक यांनी पाऊण गुंठे जागेत अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. माझ्यावरील आरोप खोटा आहे.
बाबूराव निंबाळकर,
सेवानिवृत्त तहसीलदार
माणगावमध्ये 116 ठिकाणी अतिक्रमण
माणगाव, उतेखोल, खांदाड, नाणोरे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आले आहे. त्यामध्ये उतखोलमध्ये अतिक्रमण करून बांधकाम करणार्यांची संख्या प्रचंड असल्याची माहिती नगरपंचायत कार्यालयाकडून उपलब्ध झाली आहे. यातील अनेकांविरोधात पंचायतीने कारवाई केली. परंतु, आजही ही प्रकरणे लालफितीत अडकून आहेत. माणगावला अतिक्रमण करून बांधकामाचा विळखा झाल्याने तेथील जागेचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. माणगावमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भराव करून बांधकाम केले आहेत. त्यामुळे माणगावमधील या बांधकामामुळे पावसाळ्यात पुराचा धोका येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपंचायत प्रशासनाकडून योग्य दखल घेतली जात नसल्याने असे प्रकार खुलेआम घडत आहेत.