। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग-वावे मार्गावर शुक्रवारी (दि.7) सायंकाळी दुचाकी आणि रिक्षाचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीमधील चालकासह दोघे जखमी झाले. त्यांना अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोघांच्याही पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना घोटवडेजवळ घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेलोशीमधील सागवाडी येथील रघुनाथ पिंगळा व त्यांचा मुलगा गणपत पिंगळा असे दोघेजण दुचाकीवरून अलिबागकडून वावेकडे जात होते. सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास घोटवडे येथे आल्यावर एका रिक्षाला दुचाकीची धडक लागून अपघात झाला. अपघातामध्ये दोघेही जखमी झाले. त्यांना स्थानिक व रेवदंडा पोलिसांच्या मदतीने अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. परंतु, दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात रातोरात हलविण्यात आले.