संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यातील सावंतवाडी येथे दुहेरी खून प्रकरणात सराईत गुन्हेगाराचा हात असल्याचा संशय बळावला आहे. यातच चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने, या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील काहींना सावंतवाडी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यातील एक हा गुन्ह्याच्या दिवशी त्या परिसरामध्ये रात्री साडेसात ते रात्री अकरापर्यंत वावरत होता. त्याला शालिनी सावंत यांच्या मुलाने जेवणाचा डबा देण्यासाठी गेला असता पाहिले होते. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची चौकशी करून सोडण्यात आले.
मात्र, दुसर्या दिवशी त्याने वेंगुर्ले गाठत तेथून आपल्या पत्नीला मोबाईलवर संपर्क करत आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्नही केला. संबंधिताच्या पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबतची कल्पना दिली. पोलिसांनी वेंगुर्ले परिसर गाठत त्याला ताब्यात घेतले व रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे निरीक्षक कोरे यांनी सांगितले.
सावंतवाडी शहरातील उभाबाजार परिसरात राहणार्या निलिमा खानविलकर व त्यांच्या केअरटेकर शालिनी सावंत या दोन वृद्ध महिलांचा गळा चिरून खून करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. खुद्द पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी तपासात लक्ष घातले असून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि सावंतवाडी पोलिस तपास करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीमध्ये हा खून मालमत्तेच्या कारणातून झाल्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु आज नेमका कोणत्या कारणासाठी, कशासाठी खून झाला, याचा गुंता आणखी वाढला. पोलिस सर्व शक्यता पडताळून तपास करत आहेत. चोरीच्या उद्देशानेही खून झाला असावा, अशी शक्यता असल्याचे बगाटे यांनी सांगितले.