। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण, नवी मुंबई, जेएनपीए बंदराशी जोडणार्या जासई उड्डाणपूलावरील दुसर्या मार्गिकेवरील अडथळा ठरत असलेल्या शिवमंदिर हटविण्याचा तिढा निधीमुळे अडकला आहे. या तिढ्यावर वर्षभरात तोडगा निघाला नसल्याने रखडलेल्या उड्डाणपूलाच्या दुसर्या मार्गिकेच्या कामामुळे हा उड्डाणपुल अपघाती क्षेत्र म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
दास्तानफाटा-जासई ते गव्हाणफाटा दरम्यान दररोज वाहतूक कोंडी होत होती. या वाहतुकीचा वाढता ताण कमी करण्यासाठी दास्तानफाटा-जासई ते शिवमंदिर दरम्यान 1200 मीटर लांबीचा आणि सुमारे 100 कोटींहून अधिक खर्चाचा चौपदरी उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेवरुन वर्षांपूर्वी वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. मात्र, या उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेवरील असलेल्या शिवमंदिरामुळे 100 मीटर लांबीचे काम रखडले आहे. या शिवमंदिरासाठी सिडको, जेएनपीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मध्यस्थीने 25 गुंठे जागा चिर्ले गाव हद्दीत देण्यात आली आहे. शिवाय हे शिवमंदिर हटवून चिर्ले गावाच्या हद्दीत उभारण्यासाठी जेएनपीए व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या दोन्ही विभागांकडून अडीच कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. मात्र, शिवमंदिर व मंदिरा सभोवताली संरक्षण भिंत उभारण्यासाठी सुमारे पावणेचार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे अडीच कोटींची रक्कम मंदिराच्या कामासाठी अपुरी ठरत आहे. त्यामुळे शिवमंदिर हटविण्यात आले नसल्याचे जासई सरपंच संतोष घरत यांनी सांगितले आहे.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी जेएनपीए, सिडको, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांची येत्या आठवडाभरात तातडीने बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीए प्रशासनाकडून देण्यात आली आहे.