आयपीएलच्या नविन वेळापत्रकाचा फटका
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल स्थगित करण्यात आले होते. मात्र, ही स्थगिती आता उठवण्यात आली असून, 17 मेपासून आयपीएलचे उर्वरित सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी बीसीसीआयने नवीन वेळापत्रकही जाहीर केले आहे. परंतु, अनेक विदेशी खेळाडू मायदेशी परतले असून, ते आता भारतात येण्यास नकार देत आहेत.
दिल्ली कॅपिटल्ससाठी आता उर्वरित सामने महत्त्वाचे आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. मात्र, मिचेल स्टार्कने भारतात परत येण्यास नकार दिला आहे. सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्क यांच्या परतण्याबाबतही अस्पष्टता आहे. ट्रिस्टन स्टब्सही प्लेऑफच्या सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा रयान रिकेल्टन आणि कॉर्बिन बॉश हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संघाचा भाग आहेत. साउथ आफ्रिकेने त्यांना 26 मेपर्यंत संघात सामील होण्यास सांगितले आहे. विल जॅक्सनेही भारतात येण्यास नकार दिल्याची माहिती आहे.
तसेच, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने यंदा आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संघाच्या यशात जॉस बटलर, गेराल्ड कोएट्झी आणि कागिसो रबाडा या विदेशी खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, या खेळाडूंनी भारतात परत येण्यास नकार दिला आहे. कारण, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी संघ जाहीर केला असून, या खेळाडूंना 26 मेपर्यंत मायदेशी परतण्याचे निर्देश दिले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र, त्याने भारतात परत येण्यास नकार दिला आहे. तो दुखापतग्रस्त असल्याची माहिती आहे आणि तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या संघाचा भाग आहे. याशिवाय, इंग्लंडचा फलंदाज जेकब बेथेल, वेस्ट इंडीजचा रोमारियो शेपर्ड आणि दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एनगिडी यांनीही परतण्यास नकार दिला आहे.
पंजाब किंग्सच्या संघात सर्वाधिक ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत. विशेष म्हणजे, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंच्या परतण्याबाबत कोणतीही आक्षेप घेतलेला नाही. मात्र, मार्को यान्सेन आणि जोश इंग्लिस 11 जूनपासून सुरू होणार्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल संघाचा भाग आहेत, त्यामुळे त्यांच्या परतण्याबाबत अस्पष्टता आहे. सनरायझर्स हैदराबादच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे की, हेनरिक क्लासेन, ईशान मलिंगा, कामिंदु मेंडिस आणि वियान मुल्डर यांच्या परतण्याबाबत सध्या अस्पष्टता आहे. याशिवाय, कर्णधार पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेड हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल संघाचा भाग आहेत. त्यामुळे त्यांच्या परतण्याची शक्यता कमी आहे. सनरायझर्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने त्यांच्या परतण्याचा किंवा न परतण्याचा संघावर कोणताही परिणाम होणार नाही.
बीसीसीआयकडून क्रिकेट मंडळांवर दबाव
बीसीसीआयने सोमवारी रात्री आयपीएलच्या उर्वरित वेळापत्रकाची घोषणा केली. त्यानुसार आता 17 मे ते 3 जून या कालावधीत आयपीएलचा उर्वरित मोसश खेळवला जाणार आहे. या लढतींसाठी परदेशी खेळाडूंचा सहभाग असायला हवा यासाठी बीसीसीआयकडून परदेशी क्रिकेट मंडळांवर दबाव वाढवण्यात येत आहे. खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत बीसीसीआयचा इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या दोन मंडळांशी संवाद सुरू आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून याप्रसंगी सांगण्यात आले की, आयपीएलचे सीओओ हेमांग अमिन यांना वैयक्तिकरित्या इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या दोन्ही मंडळांशी खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत संवाद साधण्यास सांगण्यात आले आहे.