| मुंबई | प्रतिनिधी |
हँगझोऊ-चीन येथे होणाऱ्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेकरीता महाराष्ट्राच्या 2 पुरुष व 2 महिला खेळाडूंची भारताच्या कबड्डी संघात निवड जाहीर झाली आहे. ठाण्याचा असलम इनामदार व नाशिकच्या आकाश शिंदे यांची भारतीय पुरुष कबड्डी संघात निवड झाली आहे. तर मुंबईची व भारतीय रेल्वेकडून खेळणारी सोनाली शिंगटे आणि पुण्याची स्नेहल शिंदे यांची भारतीय महिला संघात निवड झाली आहे.
बुसान येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळविले होते. या संघात महाराष्ट्राचा असलम इनामदार हा एकटाच खेळाडू भारतीय संघात होता. आकाश शिंदे हा भारतीय संघाच्या सराव शिबिरात होता. पण त्याची अंतिम संघात निवड झाली नव्हती. यावेळी मात्र त्याला संधी मिळाली आहे. हे दोन्ही खेळाडू डाव्या बाजूने चढाई करण्यात माहीर आहेत. बोनस करण्यातही त्यांचा हातखंडा आहे. या अगोदर देखील महिला भारतीय कबड्डी संघात या दोन महिला खेळाडूंची निवड झाली होती. या दोन्ही चढाईच्या हुकमी खेळाडू आहेत. चारही खेळाडूंच्या निवडीमुळे महाराष्ट्र कबड्डी वर्तुळात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे नवनिर्वाचित सरचिटणीस बाबुराव चांदेरे या निवडीने अत्यंत खुश झाले असून त्यांनी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. तसेच दोन्ही संघ सुवर्ण पदक मिळवून मायदेशी परत यावेत अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.