300 शेतकर्यांनी घेतले प्रशिक्षण
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील शेतकर्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत शेतकरी संस्था पातळीवर प्रशिक्षण देण्यात आले. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने आयोजित केलेल्या, या दोन दिवसीय शिबिरात 300 हुन अधिक शेतकर्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. हे शिबीर तालुका कृषी अधिकारी आणि स्वामी विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत येथे घेण्यात आले.
यावेळी श्री विवेकानंद ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मधील प्रसाद दगडे व सायली भगत यांनी 10 ड्रम थेअरीचा अवलंब तसेच थेअरी प्रात्यक्षिक करून दाखवले. विकास केंद्र बारामती येथील शास्त्रज्ञ संदीप कांबळे यांनी पूर्वीचा इतिहास, नैसर्गिक पद्धतीचा वापर कशा पद्धतीने करावा, कमी खर्चात कशा पद्धतीने लागवड नियोजन व नैसर्गिक निविष्ठा वापर, सूक्ष्म जीवाणू म्हणजे काय, त्यांचे जमिनीतले प्रमाण कशा पद्धतीने वाढवावे व सेंद्रिय प्रमाणिकरण इत्यादी विषयांवर शेतकर्यांना मार्गदर्शन केले. तसेच, शेतकर्यांना नैसर्गिक शेतीचे जीवनातील महत्व, नैसर्गिक शेती योजना संकल्पना, कंपनी स्थापनेचे उद्दिष्ट आदींबाबत मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाचे प्रास्ताविक श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे संचालक सुशील रुळेकर यांनी केले. तसेच, प्रशिक्षण वर्गामध्ये हेमंत कोंडीलकर व अजित पाटील यांनी आपल्या सेंद्रिय शेतीचे अनुभव कथन केले. तर, प्रशिक्षणात उपस्थित शेतकर्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. दरम्यान, उपविभागीय कृषी अधिकारी सुनिल निंबाळकर यांच्या हस्ते या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे, मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी, कृषी पर्यवेक्षक सचिन केने, मंगेश गलांडे यांच्यासह भुवंदना नैसर्गिक शेती गट कर्जत अध्यक्ष विनायक देशमुख, कशेळे सेंद्रिय शेती गट अध्यक्ष रवींद्र झाजे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती दहिवली अजित पाटील व माजी सरपंच प्रमिला बोराडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.