पनवेल | वार्ताहर |
भारत विकास परिषदेच्यावतीने भानघर येथील करुणेश्वर वृद्धाश्रमामध्ये हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. समाजसेविका वर्षा ठाकूर, गायिका अश्विनी भिडे, विविध संस्थांच्या महिला कार्यकारिणी व भाविपचे पदाधिकारी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यानिमित्ताने रजनी भानू यांचे साक्षीगोपाल या विषयावर कीर्तन झाले. त्यांना शरयू चिलेकर यांनी संवादिनी व माधव भागवत यानी तबलासाथ केली. यावेळी वृद्धाश्रमाच्या संचालिका करुणा ढोरे यांची ओटी भरून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. भाविप पनवेल शाखेच्या अध्यक्ष डॉ. कीर्ती समुद्र, सचिव पद्मजा कुलकर्णी, सहसचिव शंकर आपटे, संस्कार प्रमुख ज्योती कानिटकर व ग्रामविकास प्रमुख वाराणासी बालाजी राव व वाराणासी सुभा तसेच वृद्धाश्रमाचे संचालक ईश्वर व करुणा ढोरे आदींनी समारंभ यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
करूणेश्वर आधारगृहच्या संचालिका करूणा ढोरे हीच खरी आधुनिक युगातील चैत्रागौर म्हणता येईल. तीच्यातील अंगभूत सृजनतेमुळे प्रसंगी अनाथांची नाथ होते आणि करूणेश्वर आधारगृहाच्या माध्यमातून सर्जनशीलतेने मनामनात नवचैतन्याची पालवी निर्माण करते,अशी प्रतिक्रिया सचिव पद्मजा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.