। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी 24 व 25 नोव्हेंबरला सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे मेगा लिलाव पार पडणार आहे. पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या लिलावापूर्वी रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह व तिलक वर्मा यांना आपल्या संघात कायम राखले आहे. हार्दिकच्याच नेतृत्वाखाली आयपीएल 2025 मध्ये खेळणार हे फ्रँचायझीने स्पष्ट केले आहे. पण, हार्दिक पांड्यावर आयपीएलच्या पुढील पर्वातील पहिल्या सामन्यात खेळण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.
मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 साठी तगडा संघ तयार करण्यासाठी नक्की प्रयत्न करतील. पण, त्यांना आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याशिवाय खेळावे लागणार आहे. कर्णधार हार्दिकला आयपीएल 2024च्या शेवटच्या साखळी सामन्यात निर्धारीत वेळेत षटकं पूर्ण न केल्याने 30 लाखांचा दंड भरावा लागला होता. आयपीएलच्या मागील पर्वातील हार्दिककडून तिसर्यांदा ही चूक झाल्याने त्याच्यावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई केली गेली आहे. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचे स्पर्धेतील आव्हानही संपले होते, त्यामुळे हार्दिकवर लागलेली बंदी ही आयपीएल 2025च्या पहिल्या सामन्यापर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळेच हार्दिकला आयपीएल 2025 चा पहिला सामना खेळता येणार नाही.