| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमधील शारलोट तलाव, इको पॉईंटचा रस्ता आणि हनीमून पॉईंटच्या रस्त्यांची अतिवृष्टीमुळे दुर्दशा झाली आहे. या रस्त्यांवरून पर्यटकांना आणि अश्वांना चालणेदेखील शक्य होत नसल्याने आणि वारंवार सांगूनदेखील नगरपालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने सर्व अश्वपालकांनी सोमवार (दि.14) पूर्ण दिवस आपला अश्वव्यवसाय बंद ठेऊन रस्त्यावर उतरून श्रमदानातून हे रस्ते चालण्यायोग्य तयार केले.
माथेरान नगरपालिकेकडून या रस्त्यांची कामे ठेकेदारमार्फत सुरू केली, परंतु ही कामे अर्धवट स्थितीत असून यामध्ये फक्त रस्त्याच्या दुतर्फा जांभ्या दगडांचा दोन थरांचा उंचवटा तयार केल्यामुळे या पावसाळ्यात पावसाचे पाणी गटारातून वाहून न जाता रस्त्यावरून वाहत होते. यामुळे या रस्त्यांना मधोमध मोठमोठे चर पडले असून, येथील रस्त्यांची दैना झाली आहे. या रस्त्यावर सर्व दगड गोटे वर आले असून, या रस्त्यावरून नागरिकांना, पर्यटकांना व घोड्यांनादेखील चालणे फारच कठीण झाले आहे. यामुळे घोड्यांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या संदर्भात येथील स्थानिक अश्वपाल संघटनेकडून स्थानिक प्रशासनाला पण वारंवार कळविण्यात आले होते. पत्रव्यवहारदेखील केला होता. पण, त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे येथील अश्वपालकांनी सोमवार (दि.14) सकाळी 10 पासून संपूर्ण दिवस येथील रस्त्याचे काम श्रमदानातून पूर्ण केले. यासाठी येथे सर्वांनी आपला अश्वव्यवसाय पूर्ण दिवस बंद ठेवला होता. या रस्त्यावरील दगड गोटे बाजूला करून त्यावर माती टाकून रस्ता सुस्थितीत, चालण्याजोगा करण्यात आला.
आम्ही पालिकेला वारंवार या रस्त्यांबद्दल तक्रार केली होती. परंतु, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही स्वतः श्रमदानातून रस्ता चालण्यायोग्य केला आहे. आत्ता यावरून आबालवृद्धांनादेखील चालणे सोयीस्कर होणार आहे.
आशा कदम
अध्यक्षा, स्थानिक अश्वपाल संघटना